वयात येताना आरोग्याची काळजी कशी घ्यावी? उपजिल्हा रुग्णालयाकडून गारगोटीत मुलामुलींचे प्रबोधन
सेवासंकल्प अभियानांतर्गत १६० विद्यार्थ्यांना लाभ

वयात येताना आरोग्याची काळजी कशी घ्यावी ? उपजिल्हा रुग्णालयाकडून गारगोटीत मुलामुलींचे प्रबोधन
सेवासंकल्प अभियानांतर्गत १६० विद्यार्थ्यांना लाभ
गारगोटी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
वाढत्या वयातील शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जाताना मुलामुलींमध्ये योग्य आरोग्याची समज निर्माण होणे काळाची गरज आहे. याच उद्देशाने सेवासंकल्प अभियानांतर्गत भुदरगड तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय गारगोटी यांच्या वतीने स्थानिक गारगोटी हायस्कूलमध्ये किशोरवयीन मुलामुलींसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शाळेतील सुमारे १६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आरोग्यविषयक मार्गदर्शन घेतले.

उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कुलकर्णी आणि डॉ. सविता शेट्टी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना वयोमानानुसार होणारे बदल, आहाराचे महत्त्व आणि मानसिक स्वास्थ्याविषयी सविस्तर माहिती दिली.
किशोरवयीन टप्प्यात शरीरात झपाट्याने होणारे हार्मोनल बदल, त्यातून निर्माण होणारी भावनिक आंदोलने आणि अभ्यासाचा ताण यावर डॉ. कुलकर्णी यांनी प्रकाश टाकला. पौगंडावस्थेत संतुलित आहार, पाण्याचे योग्य प्रमाण आणि नियमित व्यायामामुळे शारीरिक सुदृढता कशी टिकून राहते, हे त्यांनी पटवून दिले.
डॉ. सविता शेट्टी यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता आणि त्या काळात उद्भवणाऱ्या शंकांविषयी शास्त्रीय माहिती दिली. मासिक पाळी हा एक नैसर्गिक जैविक बदल असून याविषयी समाजात असणारे गैरसमज दूर करत स्वच्छतेच्या योग्य सवयी अंगीकारल्यास संसर्गाचा धोका टाळता येतो, असे त्यांनी नमूद केले. या सत्रात विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे डॉक्टरांनी समाधान केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गारगोटी हायस्कूलचे मुख्याध्यापक मिलिंद पांगिरेकर होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय अभ्यासाबरोबरच अशा प्रकारचे आरोग्यविषयक मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरते, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.




