कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावरील हल्लेखोराची ओळख उघड; बॅगेत पॅलेस्टाईन समर्थक साहित्य, सीरिया व अल-कायदा कनेक्शन समोर

आंतरराष्ट्रीय: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावरील हल्लेखोराची ओळख उघड; बॅगेत पॅलेस्टाईन समर्थक साहित्य, सीरिया व अल-कायदा कनेक्शन समोर
दुबई / रियाध: वृत्तसंस्था
दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानाचे कॉकपिट ताब्यात घेऊन ते पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोर सहवैमानिकाची ओळख पटली आहे. भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या या संशयिताचे नाव हमाम अलहमामी असल्याचे आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांनी जाहीर केले असून तो ओमानचा मूळ नागरिक आहे. या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क, सीरिया कनेक्शन आणि कट्टरपंथी विचारसरणीचे धागेदोरे असल्याचे समोर आले आहे. सौदी अरेबियाने या घटनेनंतर ताब्यात घेतलेल्या संशयित सहवैमानिकाला पुढील चौकशीसाठी संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) तपास अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले आहे.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हमाम अलहमामी हा काही काळ सीरियामध्ये वास्तव्यास होता. तेथे तो कट्टरपंथी विचारसरणीच्या संपर्कात आला आणि दहशतवादी संघटना अल-कायदाच्या विचारधारेकडे ओढला गेला. त्याने काही वादग्रस्त धर्मोपदेशकांची भेट घेतल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्याच्या संशयास्पद हालचाली आणि टोकाच्या अतिरेकी विचारांमुळेच ओमानच्या राष्ट्रीय विमान कंपनीने त्याला गेल्या वर्षी सेवेतून बडतर्फ करत त्याच्यावर बंदी घातली होती. त्यानंतर अवघ्या आठ महिन्यांपूर्वी तो फ्लायदुबईमध्ये दाखल झाला होता. इस्रायलसोबत औपचारिक राजनैतिक संबंध नसलेल्या देशातील आणि आधीच संशयित ठरलेल्या वैमानिकाला संवेदनशील आंतरराष्ट्रीय मार्गावर उड्डाण करण्याची परवानगी कशी मिळाली, यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या वृत्तानुसार, अलहमामी याच्या साहित्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेत पॅलेस्टाईन समर्थक आणि ‘फ्री पॅलेस्टाईन’ चळवळीशी संबंधित पत्रके, पुस्तके आणि हस्तलिखित मजकूर आढळून आला. समाजमाध्यमांवरही त्याने सातत्याने ज्यू विरोधी द्वेष पसरवणारा मजकूर लिहिल्याचे समोर आले आहे. त्याने हा आत्मघातकी हल्ला एकट्यानेच आखला होता की यामागे मोठे आंतरराष्ट्रीय नेटवर्क कार्यरत होते, याचा छडा लावण्यासाठी यूएई, इस्रायल आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्था संयुक्तपणे चौकशी करत आहेत.
गल्फ न्यूज, सीएनएन आणि इतर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या माहितीनुसार, फ्लायदुबईच्या एफझेड १०७३ या बोईंग ७३७ मॅक्स विमानाने दुबईहून उड्डाण केल्यानंतर ३४ हजार फूट उंचीवर असताना अलहमामी याने अचानक कॉकपिटचे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याने कॅप्टन स्मित यांच्यावर धारदार शस्त्राने भीषण वार केले आणि विमान वेगाने खाली आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे काही सेकंदात विमानाची उंची तब्बल १४ ते १६ हजार फुटांनी खालावली. गंभीर रक्तबंबाळ अवस्थेत असतानाही कॅप्टन स्मित यांनी अविश्वसनीय धाडस दाखवत कॉकपिटचा दरवाजा उघडला. प्रवाशांमधील काही साहसी नागरिक, केबिन क्रू आणि विमानात प्रवास करणाऱ्या दोन इतर वैमानिकांनी तात्काळ आत धाव घेत हल्लेखोराला खाली पाडले आणि त्याला दोऱ्यांनी बांधून जेरबंद केले. त्यानंतर विमानाचे सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षित आणीबाणी लँडिंग करण्यात आले.
या थरारक घटनेत १७४ प्रवासी आणि क्रू सदस्यांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय धैर्याचे जगभरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दूरध्वनीवरून त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांच्या प्रसंगावधानाची प्रशंसा केली. सध्या कॅप्टन स्मित यांना विशेष विमानाने दुबईत आणण्यात आले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तसेच त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती दूतावासाने दिली आहे.



