आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा : प्रा. डॉ. केदार मारुलकर

आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा : प्रा. डॉ. केदार मारुलकर
आपटे वाचन मंदिराच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न
इचलकरंजी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
शिक्षण क्षेत्रासह समाजात सातत्याने विविध बदल घडत आहेत. या बदलत्या आव्हानांचा समर्थपणे सामना करण्यासाठी शिक्षकांनी स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणणे गरजेचे असून, त्या बदलांकडे कायम सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या कॉमर्स व मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. केदार मारुलकर यांनी केले.
येथील प्रसिद्ध आपटे वाचन मंदिराच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून २८ सप्टेंबर रोजी गुणवंत शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अंगणवाडी ते पदव्युत्तर स्तरापर्यंत ज्ञानदानाचे कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शिक्षकांना यावेळी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन प्रा. डॉ. मारुलकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या सोहळ्यात डी.के.टी.ई.चे प्रा. डॉ. विनायक गायकवाड, हातकणंगले येथील श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या प्रा. सौ. हेमांगी वडेर, गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे डॉ. राहुल कुलकर्णी, गंगामाई विद्या मंदिराच्या सौ. वर्षा निशाणदार तसेच श्री शांतिनाथ बाल विद्या मंदिराच्या सौ. लता चौगुले या गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. केदार मारुलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. ग्रंथालयाचे उपाध्यक्ष काशिनाथ जगदाळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार केला. प्रास्ताविक कार्यवाह मोहन पुजारी यांनी केले, तर सहकार्यवाह प्रा. डॉ. सुजित सौंदत्तीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मिनाक्षी तंगडी यांनी केले आणि आभार राजेंद्र घोडके यांनी मानले. या गौरव सोहळ्यास इचलकरंजी व परिसरातील विविध शाळांचे शिक्षक, सत्कारमूर्तींचे कुटुंबीय, वाचनालयाचे पदाधिकारी आणि वाचकप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




