फाशीच्या अयशस्वी प्रयत्नानंतर अमेरिकेत खळबळ; टेनेसीच्या तुरुंग प्रमुखांचा राजीनामात खळबळ; टेनेसीच्या तुरुंग प्रमुखांचा राजीनाम

फाशीच्या अयशस्वी प्रयत्नानंतर अमेरिकेत खळबळ; टेनेसीच्या तुरुंग प्रमुखांचा राजीनामात खळबळ; टेनेसीच्या तुरुंग प्रमुखांचा राजीनाम
नॅशव्हिल (अमेरिका) वृत्तसेवा
अमेरिकेतील टेनेसी राज्यात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या महिला कैदी क्रिस्टा पाईक हिला विषारी इंजेक्शन देऊन फाशी देण्याचा प्रयत्न अंगाशी आल्यानंतर मोठी प्रशासकीय उलथापालथ झाली आहे. दोन वेळा प्राणघातक औषधांचा डोस देऊनही संबंधित कैदी जिवंत राहिल्याचा अजब आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर घटनेनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, टेनेसी सुधारणा विभागाचे (डिपार्टमेंट ऑफ करेक्शन) प्रमुख फ्रँक स्ट्राडा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्याचे गव्हर्नर बिल ली यांनी हा राजीनामा स्वीकारत या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून वर्षातील उर्वरित सर्व फाशीच्या शिक्षांना तातडीने स्थगिती दिली आहे.
नेमके काय घडले?
१९९५ मधील एका हत्या प्रकरणात क्रिस्टा पाईक (वय ५०) हिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. टेनेसीच्या रिव्हरबेंड मॅक्सिमम सिक्युरिटी तुरुंगात बुधवारी रात्री तिला ‘पेंटोबार्बिटल’ या विषारी घटकाचे इंजेक्शन देण्यात आले. नियमावलीनुसार पहिला डोस निष्फळ ठरल्याचे पाहून पथकाने दुसरा डोसही टोचला. मात्र, औषधाचा शरीरावर अपेक्षित परिणाम न होता पाईक शुद्ध हरपून दीर्घ श्वसन करत जिवंत राहिली. सुमारे तासभर चाललेल्या या गोंधळानंतर वैद्यकीय आपत्कालीन पथकाला पाचारण करावे लागले. मध्यरात्री तिला नॅशव्हिल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्या शरीरातील विषारी औषध बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, ती सध्या व्हेंटिलेटरवर अत्यवस्थ अवस्थेत आहे.
प्रशासकीय अपयशावर निशाणा
या घटनेने संपूर्ण अमेरिकन न्यायव्यवस्थेत खळबळ उडवून दिली आहे. घटनेची जबाबदारी स्वीकारत तुरुंग प्रमुख फ्रँक स्ट्राडा यांनी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. आपला राजीनामा हा प्रशासकीय हितासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाईकच्या वकिलांनी तुरुंग प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. तिच्या शरीरात असलेल्या रक्तविकार आणि अतिशय बारीक रक्तवाहिन्यांमुळे इंजेक्शन देताना गुंतागुंत निर्माण होऊ शकते, असा पूर्वइशारा वैद्यकीय अहवालांद्वारे आधीच देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कैद्याला अमानुष यातना सहन कराव्या लागल्याचा आरोप कायदेशीर पथकाने केला आहे.
वर्षभरातील फाशीच्या शिक्षा स्थगित
टेनेसीमध्ये यंदा फाशीची प्रक्रिया बारगळण्याची ही दुसरी वेळ आहे. आधुनिक न्यायव्यवस्थेच्या इतिहासात विषारी रसायनांचे दोन डोस मिळूनही कैदी जिवंत राहून रुग्णालयात दाखल होण्याची ही अत्यंत दुर्मीळ घटना मानली जात आहे.
गव्हर्नर बिल ली यांनी संपूर्ण प्रकरणाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी करण्याचे जाहीर केले असून, यंदाच्या वर्षात राज्यात एकाही कैद्याला फाशी दिली जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि क्रूर वागणुकीचा मुद्दा उपस्थित करत पाईकच्या वकिलांनी तिची फाशीची शिक्षा पूर्णपणे रद्द करून ती जन्मठेपेत रूपांतरित करावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे




