वृद्धांनी चिंता करण्याऐवजी चिंतन करावे : भीमराव धुळुबुळू
मसाप’च्या ज्येष्ठ साहित्य संमेलनात ‘आनंदी वृद्धत्व आणि मराठी साहित्य’ विषयावर परिसंवाद संपन्न

वृद्धांनी चिंता करण्याऐवजी चिंतन करावे : भीमराव धुळुबुळू
मसापच्या ज्येष्ठ साहित्य संमेलनात ‘आनंदी वृद्धत्व आणि मराठी साहित्य’ विषयावर परिसंवाद संपन्न
सांगली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
ज्येष्ठांनी आयुष्याच्या उत्तरार्धात अनावश्यक चिंता करत बसण्यापेक्षा आत्मचिंतन करून आपल्या समृद्ध अनुभवांना उजाळा द्यावा. प्रत्येकाच्या जीवनप्रवासात संघर्षाचे अनेक प्रसंग आणि काही आनंदाचे सुवर्णक्षण दडलेले असतात. हे सर्व अनुभव प्रत्येकाने आत्मचरित्राच्या रूपाने शब्दबद्ध केले पाहिजेत. साहित्याची आणि कलेची आत्मिक सोबत लाभली, तर शारीरिक व्याधी किंवा वेदना शमवण्यासाठी कोणत्याही पेनकिलरची गरज भासत नाही, असे प्रेरक विचार ज्येष्ठ साहित्यिक भीमराव धुळुबुळू यांनी मांडले.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सांगलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ज्येष्ठ साहित्य संमेलनात ‘आनंदी वृद्धत्व आणि मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून धुळुबुळू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विचारवंत डॉ. अनिल मडके आणि ज्येष्ठ अभ्यासक डॉ. दिलीप शिंदे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
परिसंवादात पुढे बोलताना भीमराव धुळुबुळू म्हणाले की, आजची कुटुंबव्यवस्था बदलत चालली असून वृद्धांमध्ये एकटेपणाची भावना वाढत आहे. अशा काळात साहित्याशी जोडलेली नाळ माणसाला जगण्याचे नवे बळ देते. उतारवयात भूतकाळातील कटू आठवणी उगाळत बसण्याऐवजी आलेल्या अनुभवांचे संचित पुढील पिढीसाठी लिहून ठेवले, तर ते समाजासाठी दिशादर्शक ठरते आणि लेखनातून मिळणारा आनंद मनाला सदैव ताजेतवाने ठेवतो.
वक्ते डॉ. अनिल मडके यांनी शारीरिक व मानसिक आरोग्यावर भर दिला. ते म्हणाले सकारात्मक विचारसरणी हीच माणसाच्या आयुष्यातील अनेक संकटांवर आणि दुःखावर मात करण्याचे प्रभावी माध्यम आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या हस्ते झाले, तर संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी सूत्रे सांभाळली. उद्घाटनानंतर दिवसभरात कथाकथन, कविसंमेलन आणि परिसंवाद अशा विविध वैचारिक उपक्रमांनी संमेलन परिसर दुमदुमून गेला होता.
या सोहळ्यास मसाप सांगली शाखेचे अध्यक्ष संजय ठिगळे, कार्यवाह अभिजित पाटील, वर्षा चौगुले, नामदेव माळी यांच्यासह जिल्ह्यातील साहित्यिक, अभ्यासक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सौ. मनीषा पाटील-हारोलीकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अभिजित पाटील यांनी मानले.




