तुकाराम मुंढे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या फ्रंट पेजवर ‘रॉकस्टार फूड इन्स्पेक्टर’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या फ्रंट पेजवर ‘रॉकस्टार फूड इन्स्पेक्टर’ म्हणून गौरव
विशेष प्रतिनिधी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राच्या प्रशासकीय पटलावर आपल्या धडक आणि करड्या शिस्तीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तथा राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेचा डंका आता थेट सातासमुद्रापार वाजला आहे. अमेरिकेतील अग्रगण्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित दैनिक ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने आपल्या पहिल्या पानावर तुकाराम मुंढे यांचे छायाचित्र झळकवत त्यांच्या अन्नसुरक्षा मोहिमेची दखल घेतली आहे. वृत्तपत्राने त्यांचा उल्लेख ‘भारतातील अन्नसुरक्षेचा रॉकस्टार’ असा केला असून, आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या मोहिमेला ठळक प्रसिद्धी दिल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
‘इन इंडिया, अ फूड सेफ्टी इन्स्पेक्टर इज अ रॉकस्टार’ (भारतात एक अन्नसुरक्षा अधिकारी ठरतोय रॉकस्टार) या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या सविस्तर वृत्तात मुंढे यांच्या धाडसी कार्यशैलीचे विश्लेषण करण्यात आले आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील हॉटेल्स, बहुराष्ट्रीय साखळी कंपन्या, गोदामे आणि अगदी क्विक-कॉमर्सच्या ‘डार्क स्टोअर्स’मध्ये खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वयंपाकघरातील अस्वच्छतेविरुद्ध त्यांनी व्यापक मोहीम उघडली आहे. या अचानक केलेल्या तपासण्यांमुळे अनेक नामवंत उपाहारगृहे, डोमिनोज, पिझ्झा हटसारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससह स्थानिक ऐतिहासिक हॉटेल्सचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. वृत्तपत्राच्या मते, एका बाजूला हॉटेलचालकांमध्ये या तपासणी मोहिमेची धास्ती निर्माण झाली असली, तरी सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मात्र अन्नसुरक्षेबाबत नवा आत्मविश्वास आणि समाधान निर्माण झाले आहे.
वृत्तात मुंढे यांच्या विविध मोहिमांचा वेध घेताना मुंबईतील शंभर वर्षांहून अधिक जुन्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ‘ऑलिम्पिया कॉफी हाऊस’वरील कारवाईचा विशेष संदर्भ दिला आहे. हॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते मॅट डेमन आणि टॉम हॉलंड यांनी ज्या ठिकाणी चहापान केले होते, अशा या लोकप्रिय उपाहारगृहात तपासणीदरम्यान स्वच्छतेचे गंभीर उल्लंघन आढळल्याने तात्काळ परवाना स्थगित करण्यात आला होता. तुकाराम मुंढे यांच्या नजरेतून गल्लीबोळातील टपऱ्यांपासून ते पंचतारांकित हॉटेल्स आणि जागतिक ब्रँड्सपर्यंत कोणीही सुटू शकत नाही, असे नमूद करत त्यांच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचे कौतुक करण्यात आले आहे.
गेल्या अवघ्या तीन महिन्यांत एफडीएने राज्यभरात १२ हजारांहून अधिक तपासण्या करत कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त केला आहे. तसेच प्रतिबंधित गुटखा, निकृष्ट दर्जाची औषधे आणि भेसळीवर तातडीने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. या जागतिक प्रसिद्धीनंतर आपली भूमिका मांडताना तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, ‘चांगले प्रशासन म्हणजे वृत्तपत्रांचे मथळे मिळवणे नव्हे, तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणे होय. जेव्हा कायद्याची अंमलबजावणी निःपक्ष, निर्भय आणि सातत्यपूर्ण असते, तेव्हाच यंत्रणेवर जनतेचा विश्वास बसतो.’ महाराष्ट्रातील एका आयएएस अधिकाऱ्याच्या धडक कार्यपद्धतीची थेट अमेरिकेच्या पहिल्या क्रमांकाच्या वृत्तपत्राने अशा प्रकारे दखल घेतल्याने देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, ‘द न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या विशेष वृत्ताचा फोटो स्वतः तुकाराम मुंढे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) खात्यावरून शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी प्रशासकीय भूमिकेवर भाष्य करत लिहिले आहे की, “चांगले प्रशासन म्हणजे केवळ वृत्तपत्रांचे मथळे मिळवणे नव्हे, तर व्यवस्थेत प्रत्यक्ष सकारात्मक बदल घडवणे होय. अन्नसुरक्षेचा मूळ हेतू हा लोकांचे आरोग्य जपणे, मानकांचे काटेकोर पालन करणे आणि जनतेचा विश्वास संपादन करणे हाच आहे. जेव्हा कायद्याची अंमलबजावणी निःपक्ष, निर्भय आणि सातत्यपूर्ण असते, तेव्हाच शासकीय संस्थांवर लोकांचा विश्वास दृढ होतो.”

‘द न्यूयॉर्क टाइम्स’मधील बातमीचा फोटो शेअर करत तुकाराम मुंढे यांनी ‘X’वर (ट्विटर) व्यक्त केलेल्या भावना. (छायाचित्र सौजन्य: @TukaramMundhe / X)



