ताज्या घडामोडी

दिल्लीत चार मजली इमारत कोसळून तिघांचा मृत्यू

ढिगाऱ्याखालून ११ जणांना बाहेर काढले, महापालिकेकडून इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे निर्देश

दिल्लीत चार मजली इमारत कोसळून तिघांचा मृत्यू 

ढिगाऱ्याखालून ११ जणांना बाहेर काढले, महापालिकेकडून इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे निर्देश

​नवी दिल्ली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

ईशान्य दिल्लीतील दाटीवाटीच्या सीमापुरी भागात बुधवारी दुपारी एक चार मजली निवासी इमारत अचानक पत्त्यांसारखी कोसळली. या भीषण दुर्घटनेत एका चिमुरडीसह तिघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ११ जणांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून दिल्ली महानगरपालिकेने (एमसीडी) परिसरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

 ​अग्निशामक दल आणि पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास नियंत्रण कक्षाला इमारत कोसळल्याचा कॉल मिळाला. इमारत कोसळताच मोठा आवाज झाला आणि संपूर्ण परिसरात धुळीचे लोट पसरले. शेजारील दोन ते तीन घरांचेही या पडझडीत अंशतः नुकसान झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून दिल्ली पोलीस, अग्निशामक दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), डीडीएमए आणि महापालिकेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.

 ​ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या नागरिकांना जवळच असलेल्या ताहीरपूर येथील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी तपासणीअंती तिघांना मृत घोषित केले. मृतांमध्ये सुमारे चार महिन्यांची गरोदर असलेल्या २१ वर्षीय गुलफशा यांच्यासह एका १२ वर्षांच्या मुलीचा आणि आणखी एका लहान बालकाचा समावेश आहे. उर्वरित जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

 ​स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथके येण्यापूर्वीच स्थानिक तरुणांनी स्वतःहून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. रस्ते अरुंद असल्याने अवजड यंत्रसामग्री, क्रेन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यात सुरुवातीला अडथळे निर्माण झाले होते. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी परिसरातील वाहतूक वळवून रुग्णवाहिकांसाठी रस्ता मोकळा करून दिला.

 ​दरम्यान, महापालिका प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित इमारत अतिशय जुनी, जीर्ण आणि अनधिकृत बांधकामाचा भाग होती का, याचा तपास केला जात आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सीमापुरी आणि लगतच्या दाट लोकवस्तीच्या भागातील धोकादायक इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. अद्याप ढिगाऱ्याखाली कोणी दबले असण्याची शक्यता गृहीत धरून रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.

https://nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??