माधुरी हत्तीण नांदणी मठातच राहणार! ‘पेटा’च्या डोक्यात सर्वोच्च न्यायालयाचा सोटा; २५ हजारांचा दंड भरण्याचे आदेश

माधुरी हत्तीण नांदणी मठातच राहणार ! ‘पेटा’च्या डोक्यात सर्वोच्च न्यायालयाचा सोटा ; २५ हजारांचा दंड भरण्याचे आदेश
कोल्हापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थानातील ‘माधुरी’ हत्तीणीला पुन्हा गुजरातमधील जामनगर येथील ‘वनतारा’ प्रकल्पात हलवण्याची मागणी करणाऱ्या ‘पेटा’ (PETA) संस्थेला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार चपराक लगावली आहे. प्राणी हक्क क्षेत्रात कार्यरत असलेल्या पेटा इंडियाची ही पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून, संस्थेला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही दंडाची रक्कम माधुरी हत्तीणीच्या वैद्यकीय उपचारांसाठी वापरण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या निकालामुळे माधुरी आता कायमस्वरूपी नांदणी मठातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली. माधुरी हत्तीणीला मठात आणल्यानंतर तिला पुन्हा साखळदंडाने बांधून ठेवले जात असून तिची प्रकृती खालावत असल्याचा दावा करत, सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि तिला पुन्हा वनतारामध्ये पाठवावे, अशी मागणी पेटा संस्थेने केली होती.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने पेटाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. नांदणी मठाच्या वतीने ॲडव्होकेट मनोज पाटील, राज्य शासन आणि वनतारा व्यवस्थापनाने बाजू मांडली. सर्व पक्षांचा सविस्तर युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पेटाची याचिका फेटाळत संस्थेला दंड सुनावला.
नांदणी मठातील माधुरी हत्तीणीचे आणि स्थानिक भाविकांचे गेल्या अनेक दशकांपासून भावनिक नाते जोडले गेले आहे. काही महिन्यांपूर्वी उपचारांच्या कारणावरून तिला वनतारा येथे हलवल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत संतापाची मोठी लाट उसळली होती. नागरिकांच्या भावना आणि कायदेशीर लढ्यानंतर माधुरीची मठात पुनरागमन झाले होते. मात्र, त्यानंतरही पेटाकडून पुन्हा न्यायालयात धाव घेण्यात आल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या या ताज्या निकालाची बातमी समजताच नांदणीसह संपूर्ण शिरोळ तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले. मठाचे प्रतिनिधी, ग्रामस्थ आणि भाविकांनी एकत्र येत पेढे वाटून, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. हा सत्याचा आणि जनभावनेचा विजय असल्याचे सांगत मठाच्या विश्वस्तांनी निकालाचे स्वागत केले आहे. माधुरीच्या आरोग्याची आणि सुविधेची मठात उत्तम काळजी घेतली जात असल्याचेही यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले.




