अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी शहरात पार्किंगचे नेटके नियोजन; वाहतूक नियंत्रण शाखेकडून मार्ग निश्चित

अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी शहरात पार्किंगचे नेटके नियोजन; वाहतूक नियंत्रण शाखेकडून मार्ग निश्चित
(व्हिडिओ सौजन्य:कोल्हापूर पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा)
कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शहरात दाखल होणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेने चोख वाहतूक नियोजन केले आहे. उत्सवकाळात शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विनाअडथळा मंदिरापर्यंत पोहोचता यावे, यासाठी विविध मार्गांनी शहरात येणाऱ्या दुचाकी, चारचाकी, मिनी बसेस आणि ट्रॅव्हलर्स या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग स्थळे व पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

पुणे, सातारा आणि राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या मोठ्या बसेस व ट्रॅव्हलर्सना शिये फाटा येथून वळवून कसबा बावडा व पोलीस अधीक्षक कार्यालय चौकमार्गे खानविलकर पेट्रोल पंपाजवळील शंभर फुटी रस्त्यावरील वाहनतळावर पाठवण्यात येत आहे. या ठिकाणी वाहने उभी करणाऱ्या भाविकांसाठी मंदिरापर्यंत जाण्याकरिता बसेसची सोय करण्यात आली आहे. तावडे हॉटेलकडून शहरात येणाऱ्या ट्रॅव्हलर्स व बसेसना ताराराणी चौक आणि धैर्यप्रसाद चौकमार्गे अमेरिकन बंगला तसेच एस्तर पॅटर्न हायस्कूल मैदानावर पार्किंगची जागा दिली आहे. कर्नाटक व कागल भागातून येणाऱ्या अवजड वाहनांना शहराबाहेरूनच शाहू टोल नाका, सायबर चौक, शेंडा पार्क आणि हॉकी स्टेडियम मार्गे निर्माण चौक तसेच शाहू दयानंद हायस्कूल मैदानाकडे वळवण्यात आले आहे. राधानगरी व कोकण भागातून येणाऱ्या वाहनांना नवीन वाशी नाका येथून रिंग रोड मार्गे कळंबा तपोवन मैदानावर जागा देण्यात आली असून, गगनबावडा आणि रत्नागिरीकडून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी पंचगंगा नदी घाट परिसर निश्चित करण्यात आला आहे. निर्माण चौक आणि तपोवन मैदान या दोन्ही ठिकाणांवरूनही भाविकांना अंबाबाई मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहरात येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी मध्यवर्ती परिसरातील गर्दी लक्षात घेऊन मार्ग आखण्यात आले आहेत. दसरा चौक तसेच सीपीआर चौक मार्गाने येणाऱ्या मोटारींसाठी बिंदू चौक वाहनतळ खुले ठेवण्यात आले आहे. कागल व कर्नाटक मार्गावरून येणाऱ्या चारचाकी वाहनांना सायबर चौक, शेंडा पार्क, हॉकी स्टेडियम, गोखले कॉलेज आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौकमार्गे प्रायव्हेट हायस्कूल तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गगनबावडा रस्त्यावरून येणाऱ्या मोटारी रंकाळा तलाव परिसर, रंकाळा स्टँड आणि तटाकडील तालीम मार्गाने थेट सरस्वती टॉकीजजवळील बहुमजली वाहनतळावर जाऊ शकतील. राधानगरी रस्त्याने येणाऱ्या हलक्या वाहनांना क्रशर चौक व खरी कॉर्नरमार्गे गांधी मैदान आणि पेटाळा मैदानावरील वाहनतळावर पाठवण्यात येत आहे. याशिवाय तावडे हॉटेल व स्टेशन मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी ताराराणी चौक व दाभोळकर कॉर्नरमार्गे गोकुळ हॉटेल परिसर, दसरा चौक आणि व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिक आणि भाविकांच्या दुचाकींसाठी मेन राजाराम हायस्कूल मैदान, एमएलजी हायस्कूल मैदान, जेल रस्त्याची एक बाजू आणि गुजरी गल्ली परिसर निश्चित करण्यात आला आहे. दसरा चौकातील पारंपरिक शाही दसरा व शमीपूजन सोहळ्यासाठी स्वतंत्र राखीव व्यवस्था करण्यात आली असून, त्या दिवशी महाराणी लक्ष्मीबाई जिमखाना येथे चारचाकी तर शहाजी महाविद्यालय आणि पंचायत समिती आवारात दुचाकी व चारचाकी वाहने उभी करता येतील. मोहामेडन एज्युकेशन सोसायटी आणि चित्रदुर्ग मठ परिसर दुचाकींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
बाहेरगावावरून येणाऱ्या भाविकांना शहरातील वाहनतळे शोधणे सोपे जावे यासाठी वाहतूक शाखेकडून डिजिटल नकाशा आणि क्यूआर कोड प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन करताच उपलब्ध पार्किंग आणि तेथपर्यंत पोहोचण्याचा अचूक मार्ग गुगल मॅपवर थेट पाहता येतो. सर्व प्रमुख वाहनतळांवर प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि तात्पुरती शौचालये या मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. भाविकांनी शहरात मुख्य मार्गांवर दुहेरी पार्किंग न करता केवळ अधिकृत वाहनतळांचाच वापर करावा आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आले आहे.



