ताज्या घडामोडी

फ्रिज झाले ओव्हन ! फ्रान्समधील सुपरमार्केट्सवर मोठा सायबर हल्ला; तापमान ५० अंशांवर नेल्याने कोट्यवधींचे अन्नपदार्थ नष्ट

युरोपभर अन्नाचा शस्त्रासारखा वापर होण्याची भीती.

nynavabharatnews.online /International newsआंतरराष्ट्रीय / पॅरिस : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

फ्रिज झाले ओव्हन ! फ्रान्समधील सुपरमार्केट्सवर मोठा सायबर हल्ला; तापमान ५० अंशांवर नेल्याने कोट्यवधींचे अन्नपदार्थ नष्ट

युरोपभर अन्नाचा शस्त्रासारखा वापर होण्याची भीती.

डिजिटल युगातील सायबर युद्धाने आता थेट नागरिकांच्या ताटातील अन्नालाच लक्ष्य केले असून, फ्रान्समधील शेकडो बड्या सुपरमार्केट्सवर झालेल्या अभूतपूर्व सायबर हल्ल्याने संपूर्ण युरोप हादरला आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्स, सीबीएस न्यूज आणि फ्रेंच वृत्तवाहिनी ‘बीएफएम टीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी मध्यरात्री अज्ञात हॅकर्सनी देशभरातील सुपरमार्केट्सच्या शीतकरण प्रणालीत (रेफ्रिजरेशन सिस्टीम) घुसखोरी करून तापमान उणे अंशांवरून थेट ५० अंश सेल्सिअसपर्यंत (१२२ अंश फॅरनहाइट) वाढवले. रात्रभर शीतगृहांची झालेली ही भट्टी सोमवारी पहाटेपर्यंत सलग सुरू राहिल्याने कोट्यवधी रुपयांचे अन्न जळून व कुजून खाक झाले, तर काही स्टोअर्समध्ये अतिउष्णतेने उपकरणे पेटून आगी लागल्याच्या गंभीर घटनाही घडल्या आहेत.

​फ्रान्सच्या ‘कूपरेटिव्ह यू’, ‘इंटरमार्चे’, ‘कॅरेफोर’, ‘ई.लेक्लेर्क’ आणि ‘नेटो’ या आघाडीच्या रिटेल साखळ्यांना या सायबर घातपाताचा जबरदस्त फटका बसला आहे. एकूण १५ हजारांपैकी सुमारे ४०० हून अधिक मोठी स्टोअर्स यामुळे प्रभावित झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून अन्य शेकडो स्टोअर्सचे इंटरनेट कनेक्शन तात्काळ तोडण्यात आले. सोमवारी पहाटे स्टोअर्स उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना फ्रीझरमधून गरम हवेचे झोत आणि जळाल्याचा वास येत असल्याचे निदर्शनास आले. अल्सेस प्रांतातील केवळ दोन स्टोअर्समध्ये सुमारे अडीच लाख युरोचे नुकसान नोंदवले गेले असून, देशव्यापी वित्तीय तोटा कोट्यवधी युरोंच्या (अब्जावधी रुपये) घरात पोहोचल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय वित्तीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.

​तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, डॅनिश बहुराष्ट्रीय अभियांत्रिकी कंपनी ‘डॅनफॉस’ (Danfoss) कडून पुरवल्या जाणाऱ्या रिमोट कुलिंग सॉफ्टवेअरमधील तांत्रिक त्रुटीचा गैरफायदा घेऊन हा हल्ला चढवण्यात आला. बर्फ वितळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘सक्तीच्या डीफ्रॉस्ट सायकल’ची आज्ञाप्रणाली हॅकर्सनी सलग चालू ठेवून उपकरणांचे तापमान टोकाला नेले. दरम्यान, नेदरलँड्स आणि बेल्जियममधील आघाडीच्या ‘अहोल्ड डेलहाइझ’ (Ahold Delhaize) या आंतरराष्ट्रीय सुपरमार्केट समूहाच्या आयटी नेटवर्कवरही सायबर सुरक्षेचे संकट निर्माण झाल्याने त्यांची ऑनलाइन सेवा विस्कळीत झाली असून, हा हल्ला आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरल्याचा संशय बळावला आहे.

 ​या भीषण घटनेची पॅरिसच्या सरकारी अभियोक्ता कार्यालयाने ‘अत्यावश्यक राष्ट्रीय पायाभूत सुविधांवरील संघटित सायबर गुन्हा’ म्हणून उच्चस्तरीय तपास सुरू केला आहे. तिकडे युरोपीय अन्न व कृषी आयुक्त क्रिस्टोफ हॅन्सन यांनी तीव्र संताप व्यक्त करत, आधुनिक जगात आता ‘अन्नाचा शस्त्रासारखा वापर’ (Weaponization of Food) सुरू झाल्याचा गंभीर इशारा दिला आहे. अन्नसुरक्षेला थेट वेठीस धरणाऱ्या या सायबर दहशतवादामुळे युरोपियन युनियनमधील इतर देशांच्या पुरवठा साखळीतही आता हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे.

https://nynavabharatnews.online/

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??