गुहागरच्या शिक्षिका माधवी पाटील यांना राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६-२७ जाहीर

गुहागरच्या शिक्षिका माधवी पाटील यांना राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६-२७ जाहीर
गुहागर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
गुहागर तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका श्रीमती माधवी मारुती पाटील यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्यावतीने प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ साठी निवड झाली आहे. त्यांच्या या राज्यस्तरीय यशामुळे तवसाळ तांबडवाडीसह पडवे केंद्रातील शाळा आणि संपूर्ण गुहागर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सततचे परिश्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राबवलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रभावी अध्यापन पद्धती या सर्व कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या अंगभूत कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी, रंजक व प्रभावी व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर त्यांच्यातील आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि व्यक्तित्व विकास घडवण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत कौतुकास्पद आहे.
शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार असतो, या भावनेतून कार्य करणाऱ्या माधवी पाटील यांच्या शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली जाणे ही तवसाळ तांबडवाडीच्या आदर्श शाळेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्राला एक नवी प्रेरणा मिळणार असून, शाळेने यशाची अशीच उंच भरारी घेत राहावी, अशा सदिच्छा सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. अंकुर मोहिते यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच शिक्षणप्रेमी श्री. सचिन कुळये यांनी दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामस्थ, महिला मंडळ आणि मुंबई युवक मंडळाच्या वतीनेही त्यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत असून, या यशामुळे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडीच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.



