आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

कोल्हापुरात उसाच्या दराचा तिढा सुटला; किणी टोलनाक्यावरील ६१ तासांचे चक्काजाम आंदोलन अधिकृतपणे मागे : 4200 दरावर अंतिम तोडगा जाहीर 

कोल्हापुरात उसाच्या दराचा तिढा सुटला; किणी टोलनाक्यावरील ६१ तासांचे चक्काजाम आंदोलन अधिकृतपणे मागे : 4200 दरावर अंतिम तोडगा जाहीर 

​कोल्हापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदर आंदोलनाचा अखेर सुखद शेवट झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या मॅरेथॉन बैठकीत उसाला प्रतिटन चार हजार दोनशे रुपये विनाकपात दर देण्याचा सुधारित प्रस्ताव मान्य करण्यात आला. या यशस्वी वाटाघाटीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर सुरू असलेले तब्बल सलग ६१ तासांचे चक्काजाम आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. या ऐतिहासिक तोडग्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील रखडलेला गाळप हंगाम आता पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

​चालू गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून प्रतिटन साडेचार हजार रुपये मिळावेत, अशी आक्रमक मागणी रेटून धरली होती. मात्र, साखर कारखानदार तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपयांपेक्षा जास्त दर देण्यासाठी तयार नव्हते, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. सलग तीन ते चार उच्चस्तरीय बैठका निष्फळ ठरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. शेतकरी वर्गाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि मार्ग काढण्यासाठी राजू शेट्टी यांनी लवचिक भूमिका घेत आपली मागणी साडेचार हजार रुपयांवरून चार हजार दोनशे रुपयांवर आणली. परंतु, कारखान्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाची दिवाळी महामार्गावरच साजरी करावी लागण्याची परिस्थिती ओढावली होती. 

​मागण्या मान्य न झाल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी किणी टोलनाक्याजवळ ठिय्या मांडत पुणे-बंगळुरू महामार्ग पूर्णपणे रोखून धरला होता. सलग ६१ तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. प्रशासनाची आणि पोलिसांची मोठी धावपळ उडाली असतानाच, परिसरातील गावांमधून आंदोलक शेतकंसाठी अन्नधान्य, भाजीपाला आणि जेवणाची मोठी मदत गोळा झाली होती. आंदोलनाची तीव्रता वाढत गेल्याने आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने राज्य सरकारने यात तातडीने मध्यस्थी केली. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेमध्ये कारखानदारांनी अखेर नमती भूमिका घेत शेतकऱ्यांच्या सुधारित मागणीला मंजुरी दिली. 

​या यशस्वी तोडग्यानंतर बोलताना राजू शेट्टी यांनी महामार्ग बंद असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागलेला सामान्य प्रवासी आणि वाहनचालकांची जाहीर दिलगिरी व्यक्त केली. तसेच, दिवसरात्र एक करून हक्काच्या दरासाठी महामार्गावर ठाण मांडणारे शेतकरी, महिला, पोलीस प्रशासन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून खंबीर पाठबळ देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. या वाटाघाटीनंतर पुकारण्यात आलेला प्रादेशिक बंदही स्थगित करण्यात आला असून, कोल्हापूरच्या या पॅटर्नच्या धर्तीवर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठीही आता हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून रखडलेली साखर कारखान्यांची चाके आता वेगाने फिरायला लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??