E20′ पेट्रोलच्या नावाखाली ग्राहकांची लूट; कर्नाटकात थेट ३१ टक्क्यांपर्यंत इथेनॉलचे मिश्रण आढळल्याने खळबळ

E20′ पेट्रोलच्या नावाखाली ग्राहकांची लूट ; कर्नाटकात थेट ३१ टक्क्यांपर्यंत इथेनॉलचे मिश्रण आढळल्याने खळबळ
बेंगळुरू : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
देशभरात सध्या ‘E20’ इंधन धोरणांतर्गत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी असताना, प्रत्यक्षात मात्र ग्राहकांच्या पदरी मोठी फसवणूक पडत असल्याचे समोर आले आहे. कर्नाटक सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने केलेल्या एका गुप्त तपासणीत राज्यातील पेट्रोल पंपांवर तब्बल ३१.२ टक्क्यांपर्यंत इथेनॉलचे मिश्रण केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकारामुळे नामांकित सरकारी आणि खाजगी तेल कंपन्या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या असून, वाहनचालकांना दरवर्षी अब्जावधी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.
कर्नाटकचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रिजवान अरशद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या तपासणीचा अहवाल जाहीर केला. राज्य सरकारच्या कायदेशीर मापनशास्त्र विभागाने (Legal Metrology Department) ‘मिशन निखरा’ अंतर्गत बेंगळुरू, कोलार, चिकबळ्ळापूर, रामनगर, तुमकुरू आणि मंगळुरू यांसह सात जिल्ह्यांमधून पेट्रोलचे ६३ नमुने गोळा केले होते. हे नमुने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL), भारत पेट्रोलियम (BPCL) तसेच नायरा एनर्जी आणि शेल या कंपन्यांच्या अधिकृत पंपांवरून घेण्यात आले.
या तपासणीदरम्यान प्राथमिक संशय आल्यानंतर जेव्हा तेल कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडे इंधनातील इथेनॉलच्या प्रमाणाबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा एकाही कंपनीने याचे स्पष्ट उत्तर दिले नाही. त्यामुळे राज्य सरकारने हे सर्व नमुने राष्ट्रीय चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळा प्रमाणन बोर्डाच्या (NABL) मान्यताप्राप्त खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. या चाचणीच्या अहवालात धक्कादायक वास्तव समोर आले असून जवळपास ८० टक्के नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण नियमापेक्षा खूपच जास्त म्हणजेच २० टक्क्यांच्या वर आढळले आहे. यामध्ये इंडियन ऑइलच्या एका नमुन्यात सर्वाधिक ३१.२ टक्के, तर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या ‘पावर’ पेट्रोलमध्ये ३०.५ टक्के इथेनॉलचे मिश्रण असल्याचे निष्पन्न झाले. इतर नमुन्यांमध्येही हे प्रमाण २२ ते २७ टक्क्यांच्या आसपास नोंदवले गेले आहे. या अतिरिक्त मिश्रणामुळे देशातील वाहनचालकांचे अपरिमित नुकसान होत असल्याकडे मंत्री रिजवान अरशद यांनी लक्ष वेधले. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढल्यास वाहनांचे मायलेज १० टक्क्यांपर्यंत घसरते. यामुळे ग्राहकांना इंधनासाठी दरवर्षी हजारो कोटींचा अतिरिक्त खर्च करावा लागतो. याशिवाय, इथेनॉलच्या रासायनिक गुणधर्मांमुळे इंजिनमधील रबरचे भाग, पाईप्स, गॅस्केट आणि ओ-रिंग्ज यांचे वेगाने नुकसान होते. देशातील जवळपास ९९ टक्के वाहने ही केवळ २० टक्के किंवा त्यापेक्षा कमी इथेनॉलचे मिश्रण सहन करण्यासाठी तयार करण्यात आली आहेत, तर एप्रिल २०२३ पूर्वीच्या गाड्या केवळ ई१० (१० टक्के) इंधनासाठी सक्षम आहेत. अशा स्थितीत ३० टक्क्यांहून अधिक इथेनॉल असलेले पेट्रोल वाहनांमध्ये गेल्याने इंजिन निकामी होण्याचा आणि दुरुस्तीचा खर्च वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
इतकेच नव्हे तर पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वितरण मशिन्स (डिस्पेंसिंग युनिट्स) या केवळ १५ टक्क्यांपर्यंतच्या (E15) मिश्रणासाठी प्रमाणित केलेल्या आहेत. त्यामुळे या मशिन्सच्या पायाभूत सुविधांवर आणि अचूकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत कर्नाटक सरकारने हा तपासणी अहवाल तातडीने केंद्र सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने यावर तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. तेल कंपन्यांच्या या मनमानी कारभारामुळे ज्या ग्राहकांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक भरपाई देण्यासाठी केंद्राने ‘स्पॉयलेज फंड’ (नुकसान भरपाई निधी) तयार करावा, अशी मागणी रिजवान अरशद यांनी केली आहे. यासोबतच, ग्राहकांना शुद्ध पेट्रोल निवडण्याचा अधिकार मिळावा आणि प्रत्येक पेट्रोल पंपावर विकल्या जाणाऱ्या इंधनातील इथेनॉलचे अचूक प्रमाण स्पष्टपणे फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक करावे, असा आग्रहही राज्य सरकारने धरला आहे. या शोधमोहिमेमुळे आता देशभरातील ई२० इंधन धोरणाच्या अंमलबजावणीवर आणि तेल कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.




