सीबीएसई १० वी ,१२ वीच्या परीक्षा १६ फेब्रुवारीपासून ; वेळापत्रक तब्बल १०१ दिवस आधी जाहीर, देशभरातून ४६ लाख विद्यार्थी देणार परीक्षा

सीबीएसई १० वी ,१२ वीच्या परीक्षा १६ फेब्रुवारीपासून ; वेळापत्रक तब्बल १०१ दिवस आधी जाहीर, देशभरातून ४६ लाख विद्यार्थी देणार परीक्षा
नवी दिल्ली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या दहावी आणि बारावीच्या मुख्य लेखी परीक्षांची तारीख जाहीर करत संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. दोन्ही इयत्तांच्या परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ पासून देशभरासह परदेशातील केंद्रांवर सुरू होणार आहेत. इतिहासात प्रथमच परीक्षा सुरू होण्यापूर्वी तब्बल १०१ दिवस आधी मंडळाने सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या हाती दिले आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारी धांदल उडणार नसून, विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन आणि सराव परीक्षांसाठी मुबलक वेळ मिळणार आहे.
जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, दहावीची लेखी परीक्षा ९ मार्च रोजी आटोपणार असून, बारावीची परीक्षा ९ एप्रिलपर्यंत चालणार आहे. सर्व विषयांचे पेपर एकाच सत्रात सकाळी १०:३० वाजता सुरू होतील. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका समजून घेण्यासाठी आणि वाचनासाठी परीक्षेपूर्वी १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. यंदा दहावीसाठी ८३, तर बारावीसाठी तब्बल १२१ विषयांचे पेपर होणार आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या ४० हजारांहून अधिक विषय संयोजनांची (Subject Combinations) अचूक पडताळणी करून हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. परिणामी, कोणत्याही विद्यार्थ्याचे दोन महत्त्वाचे पेपर एकाच दिवशी येणार नाहीत आणि दोन कठीण विषयांच्या दरम्यान अभ्यासासाठी पुरेसा अवधी मिळेल, याची खबरदारी मंडळाने घेतली आहे.
लेखी परीक्षा सुरू होण्यापूर्वी अंतर्गत मूल्यमापन आणि प्रात्यक्षिक परीक्षांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. देशभरातील सर्व नियमित शाळांमध्ये १ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत प्रॅक्टिकल परीक्षा पार पडतील. मात्र, उत्तर भारतातील अतिथंड व बर्फवृष्टीच्या डोंगराळ भागांतील हिवाळी शाळांसाठी विशेष तरतूद करण्यात आली असून, तेथे या परीक्षा ९ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर दरम्यानच पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण दररोजच्या दररोज मंडळाच्या पोर्टलवर ऑनलाइन अपलोड करणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.
या शैक्षणिक वर्षात दहावीसाठी २६ लाख ५० हजार, तर बारावीसाठी १९ लाख ८० हजार अशा एकूण ४६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार, कॉपी आणि पेपरफुटीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळाने यंदा सुरक्षा यंत्रणा अधिक कडक केली आहे. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही निगराणी, थेट वेबकास्टिंग, डिजिटल हजेरी प्रणाली आणि उत्तरपत्रिकांवर गोपनीय बारकोड अशा उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) यंदाही प्रश्नपत्रिकेत विचारप्रवर्तक आणि संकल्पनांवर आधारित (Competency-Based) प्रश्नांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनधिकृत सामाजिक माध्यमांवरील अफवांना बळी न पडता, संपूर्ण विषयनिहाय ‘डेटशीट’ मंडळाच्या cbse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच डाऊनलोड करावी, असे आवाहन परीक्षा नियंत्रकांनी केले आहे.




