राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’; राज्य शासनाची मान्यता ई-लर्निंग, शुद्ध पाणी आणि आधुनिक स्वयंपाकघराची सुविधा
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’; राज्य शासनाची मान्यता ई-लर्निंग , शुद्ध पाणी आणि आधुनिक स्वयंपाकघराची सुविधा
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
मुंबई : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
राज्यातील अंगणवाडी केंद्रांचा चेहरामोहरा बदलून तेथील सेवा अधिक आधुनिक आणि दर्जेदार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याअंतर्गत राज्यातील ३,८३२ अंगणवाडी केंद्रांचे रूपांतर ‘स्मार्ट अंगणवाडी’मध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि सुधारित पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
बालकांच्या शारीरिक व बौद्धिक जडणघडणीत अंगणवाडी केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या केंद्रांमधून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जातात. याचबरोबर गर्भवती महिला आणि स्तनदा मातांनाही पोषण व आरोग्याशी निगडित सेवा येथे पुरवल्या जातात. केवळ पारंपरिक कामकाजापुरते मर्यादित न राहता, ही केंद्रे आदर्श आणि बालस्नेही व्हावीत, यासाठी शासनाने स्मार्ट अंगणवाडी ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. चिमुकल्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी वातावरणात दर्जेदार शिक्षण मिळावे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.
स्मार्ट अंगणवाड्यांसाठी केंद्रांची निवड करताना शासनाने स्पष्ट निकष लावले आहेत. जी अंगणवाडी केंद्रे शासकीय जागेत कार्यरत आहेत आणि जिथे नियमित विद्युत जोडणी उपलब्ध आहे, अशाच केंद्रांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. या निकषांनुसार पडताळणी करून राज्यातील ३,८३२ अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट दर्जा देण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. स्वतःची इमारत आणि विजेची उपलब्धता असल्यामुळे या ठिकाणी डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करणे सोयीचे होणार आहे.
निवड झालेल्या केंद्रांना शासनामार्फत ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ अंतर्गत विविध आधुनिक साहित्य आणि सुविधा दिल्या जाणार आहेत. बदलत्या काळाची गरज ओळखून ई-लर्निंगसाठी आवश्यक असलेले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील बालकांनाही खासगी पूर्वप्राथमिक शाळांच्या धर्तीवर डिजिटल माध्यमातून खेळता-खेळता शिकण्याची संधी मिळेल. यासोबतच मुलांमध्ये लहानपणापासूनच स्वच्छतेच्या सवयी रुजाव्यात, यासाठी स्वच्छ भारत किट, पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर आणि हात धुण्यासाठी स्वतंत्र बेसिनची सुविधा उभारण्यात येणार आहे.
शैक्षणिक आणि आरोग्यविषयक साहित्याबरोबरच अंगणवाडीच्या भौतिक स्वरूपातही मोठा बदल घडवून आणला जाणार आहे. अंगणवाडी इमारतीची आकर्षक रंगरंगोटी करून तेथे बालकांना आवडेल अशी वातावरणनिर्मिती केली जाईल, तसेच इमारतीची आवश्यक असलेली किरकोळ दुरुस्तीही पूर्ण केली जाणार आहे. पर्यावरणपूरक दृष्टिकोन जपत पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बालकांना दिला जाणारा पोषण आहार अधिक स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात तयार व्हावा, यासाठी स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण करण्याचाही या योजनेत समावेश आहे.
राज्यातील अंगणवाडी व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी टप्प्याटप्प्याने स्मार्ट अंगणवाड्यांची निर्मिती केली जात असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. बालकांच्या पोषण, आरोग्य आणि प्रारंभिक शिक्षणासाठी अधिकाधिक गुणवत्तापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा शासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे अंगणवाडी केंद्रांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होऊन पालकांचा शासकीय अंगणवाड्यांवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




