गझल मंथन’ची वार्षिक गझल लेखन महास्पर्धा २०२७ जाहीर
वर्षभर रंगणार बारा फेऱ्या; पाच विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सन्मान

गझल मंथन’ची वार्षिक गझल लेखन महास्पर्धा २०२७ जाहीर ; वर्षभर रंगणार बारा फेऱ्या ; पाच विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सन्मान
मुंबई : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
गझल लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित तसेच अनुभवी गझलकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने ‘गझल लेखन महास्पर्धा २०२७ – नवे पर्व’ या वार्षिक उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. वर्षभर चालणाऱ्या या साहित्यिक महास्पर्धेची पहिली फेरी ३० जानेवारी २०२७ रोजी पार पडणार असून, अंतिम पाच विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

एकूण बारा फेऱ्यांमध्ये रंगणारी ही महास्पर्धा दर महिन्याच्या ३० तारखेला आयोजित केली जाईल. स्पर्धकांच्या लेखनकौशल्याचा कस लागावा यासाठी प्रत्येक महिन्याकरिता वेगवेगळे वृत्त निश्चित केले जाणार असून, सुप्रसिद्ध गझलकारांकडून या रचनांचे परीक्षण होईल. प्रत्येक महिन्यातील विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल. स्पर्धकांना संबंधित वृत्ताचा अभ्यास आणि सराव करता यावा, यासाठी प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला त्या महिन्यातील वृत्तावर विशेष सराव उपक्रम राबविला जाणार आहे. पहिल्या फेरीसंदर्भातील सविस्तर निवेदन लवकरच प्रसिद्ध केले जाईल.
बारा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अंतिम विजेत्यांची निवड केली जाणार आहे. या निवडीसाठी स्पर्धकांचा किमान दहा फेऱ्यांमध्ये सहभाग असणे आवश्यक असून, मासिक स्पर्धांमध्ये सर्वाधिक वेळा निवड झालेल्या रचनांच्या आधारे अंतिम विजेते घोषित केले जातील. ही महास्पर्धा केवळ ‘गझल मंथन १’ आणि ‘गझल मंथन २’ या समूहांवरच होणार असल्याने स्पर्धकांनी आपल्या रचना याच समूहांवर सादर करणे बंधनकारक आहे. वैयक्तिकरीत्या पाठविलेल्या गझला स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महास्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी पूर्णिमा पवार यांच्या वतीने ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी संजय तिडके यांच्या वतीने ३ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी डॉ. मीना सोसे यांच्या वतीने २ हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. याशिवाय चतुर्थ क्रमांकाला भरत माळी यांच्या वतीने १ हजार ५०० रुपये आणि पंचम क्रमांकाला शिवाजी साळुंखे यांच्या वतीने १ हजार रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात येईल. या पाचही विजेत्यांना रोख रकमेसोबतच सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या महास्पर्धेच्या अधिक माहितीसाठी चेतन पवार यांच्याशी ९६०४२४२३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा. गझल लेखनाची आवड असणाऱ्या नवोदित तसेच अनुभवी गझलकारांनी या वार्षिक उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, प्रसिद्धीप्रमुख भरत माळी यांच्यासह कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सचिन इनामदार, उपाध्यक्ष धनंजय पाटील व संस्थेच्या सर्व कार्यकारिणी पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.



