ताज्या घडामोडी

रविवार विशेष लेख :आपणच व्हावे श्रावणमास…!

 

आपणच व्हावे श्रावणमास…!

 

या काळात अवघ्या सृष्टीच्या सुंदर मंदिरी श्रावणाचा गंध दरवळतो आहे.

आला श्रावण श्रावण…

झाले चिंब सृष्टी मन…

कृष्णमेघांचे पाऊल…

श्रावणाची ही चाहूल…!!!

​हिरवाईचे हे गीत हरित तृण गात आहे. श्रावणमास सुरू झाला की मला नेहमी वाटते, श्रावण हा आपल्या जीवनाचे प्रतीक आहे. बालकवींच्या कवितेतील श्रावण आपल्याला जीवनाचा संदेश देतो; जीवनाच्या अंगणात सुद्धा क्षणात सुखाच्या सरी बरसतात, तर क्षणात ग्रीष्माचा दाह सोसावा लागतो… असा ऊन-पावसाचा श्रावण आपणांस आपला सखा वाटू लागतो.

​२१ जून २००० रोजी मी शिवप्रभूंच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या पन्हाळ्याच्या ‘संजीवन विद्यानिकेतन’ या निवासी प्रशालेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो. २६ वर्षांपूर्वी पुढील दोन महिन्यांनी पन्हाळ्यातील पहिल्या श्रावणसरी मला चिंब करून गेल्या. ती श्रावण-ओल आजही मनात खोलवर रुजलेली आहे, याची मला नेहमी अनुभूती येते. पन्हाळ्यातील श्रावणातला धुक्याचा महाल… श्रावणच जणू इथल्या निसर्गाला बहाल करतो…!!! झिम्माड बरसणाऱ्या श्रावणधारा, अंगाला विलक्षण झोंबणारा गार वारा आणि अशा धुंद वातावरणात तीन दरवाजावरून साद घालणारा वाफाळलेला चहा! तिखट-मीठ लावून लिंबू पिळलेले गरमागरम कणीस, मिठात एकरूप झालेल्या उकडलेल्या ओल्या-गोडसर भुईमुगाच्या शेंगा… आहाहा…! श्रावण असा रसनेला तृप्त करून जातो. ही तृप्तता शब्दांत काय वर्णावी!

​पन्हाळ्यातील श्रावणात प्रत्येक शेतकऱ्याच्या परड्यातील अळूची हिरवाई… दर श्रावणी सोमवारी उपवास सोडताना खमंग अळूवड्या, मुळ्याची कोशिंबीर आणि गरम वरण-भातावर साजूक तुपाची धार…! असे वाटते, चार-पाच वर्षांनी संजीवनमधील सेवाकाळ संपल्यानंतर पन्हाळा सोडून कोल्हापूरला गेलो, तरी पन्हाळ्याच्या श्रावणाचा जिव्हाळा, इथल्या भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांच्या मनातील आपुलकी, मातीशी जडलेला लळा आणि आठवणींचा उमाळा… हा आठवणींतील श्रावण मनाच्या अंगणी अखंड बरसत राहील. दर सोमवारी शेजारचे शेतकरी अळूची कोवळी हिरवी पाने भरभरून देतात. “मामा, अहो पुरे आता, भरपूर अळू दिलात!” असे मी म्हणालो, की ते प्रेमाने म्हणतात, “अहो घ्या गुरुजी, खा तोंड भरून खमंग गरमागरम अळूवड्या… आवं खाऊन सरलं असतं, तर जगच संपलं असतं…!!!” असे आयुष्य जगलेले आणि जगण्याचे तत्त्व शिकवणारे हे साधे शेतकरी मला खूप काही देऊन जातात.

​पन्हाळ्याच्या आणि अखिल सृष्टीच्या काळजावर विराजमान झालेला श्रावण आपल्याला जगण्याच्या वाळवंटात सुख-स्वप्नांची हिरवाई शोधण्याची सुरम्य उमेद देतो. श्रावणधारांप्रमाणे या सुंदर सृष्टीवर, जगण्यावर, जन्मावर आणि सकलांवर प्रेमाची अखंड बरसात करावी. आपल्या स्नेहात माणसे चिंब व्हावीत. एखाद्याच्या ग्रीष्मदाहरूपी जीवनात आपण हिरवाईचा श्रावण होऊन उतरावे. अवघ्या सृष्टीतील श्रावणाचा मोरपिसारा आपल्याला हेच सांगतो—आपणच श्रावण व्हावे, इतरांच्या अंगणी बहरावे आणि आपले जगणे इतरांसाठी ‘श्रावणी’ होऊन जावे. श्रावणातील पोथी-पुराणांसोबत आपण हा हिरवा निसर्ग वाचावा, ‘माणूस’ नावाचा ग्रंथ समजून घ्यावा आणि ‘आयुष्य’ नावाचे पुस्तक उमजून घ्यावे. एखाद्या श्रावणी सायंकाळी दऱ्याखोऱ्यांतून छानपैकी भटकून यावे, श्रावणधारांत चिंब भिजावे आणि आयुष्यातील आत्मानंदाचा श्रावण शोधावा.

​श्रावणाप्रमाणेच आपले जीवन हा आनंद, मांगल्य आणि मानवतेचा उत्सव आहे. मानले तर आपला रोजचा दिवस नवा श्रावण आहे. इतरांच्या दुःखी जीवनात सुखाच्या सरी होऊन बरसणे, हीच जीवनरूपी श्रावणाची खरी हिरवाई! पाडगावकरांचा श्रावण मोरपिसारा होऊन भोवताली मोहरतो, त्याचप्रमाणे आपणही दुःखाच्या उन्हात सुखाचा मोरपिसारा फुलवून जगावे; आणि मुख्य म्हणजे—’जे जे जगी उदास, तयांकरिता आपण व्हावे श्रावणमास!’

​श्रावणातील व्रतवैकल्ये आणि उपवासांप्रमाणे आपणही रोज थोडा वेळ मोबाईलचा उपवास करण्याचा संकल्प करूया. श्रावणातील पोथीवाचनाप्रमाणे ग्रंथालयातील सकस पुस्तके वाचूया.

​श्रावण आपल्याला संयम शिकवतो, मनाला सात्विकता देतो, मनातील ऋजुता आणि माणसातील देवत्व जागे करतो. देवत्वाचा हा श्रावण आपल्या मनात सदासर्वकाळ मोहरत ठेवूया; सकारात्मक विचारांची पालवी सदैव टवटवीत ठेवूया.

​या श्रावणाची भुरळ कुसुमाग्रजांना पडली; कवीवर्यांना श्रावण हसरा-लाजरा दिसला. हाच श्रावण गीतकार आनंद बक्षींना ‘किसी की याद’ वाटला. श्रावण कधी कविता झाला, गीत झाला, तर कधी वियोगिनीच्या डोळ्यांतील धारा झाला. आपणही कोणासाठी तरी आनंदाची कविता होऊया, पवित्र प्रीतीचे गीत होऊया. कोणाच्या डोळ्यांतील अश्रू पुसून त्या भिजल्या डोळ्यांना आनंदाचा श्रावण देऊया.

​श्रावण होऊन जगणे म्हणजे इतरांवर सुखाची बरसात करणे. यासाठी प्रसंगी आपल्याला वेदनांचा दाह पचवावा लागेल; बहर येण्यापूर्वीची पानगळ सोसावी लागेल. ही जाणीव ठेवून जगलो, तरच जगण्याचे मर्म उमजेल.

​श्रावणात आपण विविध मंदिरांत देवदर्शनाला जातो. मला वाटते, यानिमित्ताने श्रावण आपल्यातील माणूसपण जागे करतो. देवदर्शनाला जाताना आपण फुले, नारळ, खडीसाखर, अगरबत्ती मंदिराबाहेरील छोट्या विक्रेत्यांकडून घेतो आणि त्यांच्या चार घासांचे निमित्त ठरतो. हा जो आपला देणारा हात आहे, तोच खरा ‘श्रावण-हात’ आहे. आपणही श्रावणासारखे देत राहावे. हे देणे आनंदसरींचे असावे, हास्याच्या हिरवाईचे असावे. इतरांच्या जगण्यात श्रावण होऊन मोहरावे. भोवतालच्या चराचरात असावे, पण कुठेही अहंपणाने दिसू नये. मनाच्या पानातून हसावे, एखाद्या ग्रीष्म-जीवाशेजारी घटकाभर बसून त्याचे सुख-दुःख पुसावे आणि त्या तप्त मनाला आपल्या शब्द-श्रावणाचा गारवा द्यावा. हेच श्रावण होऊन फुलणे आहे.

​श्रावण आपल्याला नाती जपायला शिकवतो. नागपंचमीची भूतदया, माहेरची माया आणि रक्षाबंधनाची प्रेमळ सावली… अहो, श्रावण म्हणजे साक्षात हिरवा राया! श्रावणमासातील सणासुदीच्या निमित्ताने सासुरवाशीणी माहेरी येतात. चला, आपणही कोणाचे तरी मायेचे माहेर होऊया, प्रेमाचा आहेर होऊया. इतरांच्या जगण्याचा भक्कम आधार होऊया, कोणाच्या तरी जीवनात सुखाची श्रावण-धार होऊया आणि मानवतेच्या गळ्यातील संवेदनेच्या फुलांचा देखणा हार होऊया.

​असा हा जीवनसंदेश देणारा श्रावण साद घालतो आहे; आपणही आपल्या मनात एक प्रफुल्लित, आनंदी आणि तृप्त श्रावण साकारूया…

​सांगे श्रावण श्रावण…

दुःख पिऊनी जगावे…

जीवनाच्या अंगणात…

क्षणोक्षणी उमलावे…!!!

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??