विशेष लेख :
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
अस्थिर हिमालय : विकासाचा अतिरेक की विनाशाची नांदी?
२६ नोव्हेंबर रोजी नेपाळमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे मन अगदी खिन्न झाले; परंतु ही घटना केवळ एक नैसर्गिक दुर्घटना नसून मानवाने निसर्गाकडे केलेले दुर्लक्षच यामधून अधोरेखित होते. विकासाच्या नावाखाली निसर्गाची होणारी कत्तल आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती हे याचे मुख्य कारण आहे. नेपाळमध्ये तो सामान्य मान्सूनचा पाऊस नव्हता. हिमालयीन प्रदेशात, नेपाळ–तिबेट सीमेजवळ हिमनदीतील बर्फ आणि मोठ्या प्रमाणात खडक कोसळले. या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर बर्फ, खडक आणि मातीचा ढिगारा नदीपात्रात आला.
त्यामुळे भोटे कोशी आणि लेंडे खोला नदी प्रणालीमध्ये अचानक पाण्याचा आणि प्रचंड गाळाचा प्रवाह निर्माण झाला. या अचानक आलेल्या प्रवाहामुळे फ्लॅश फ्लड (Flash Flood) व चिखलाचा महापूर आला आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुरुवातीला या घटनेची नोंद भूकंपासारखी झाली होती; मात्र नंतरच्या विश्लेषणानुसार हा सामान्य भूकंप नसून भौगोलिक भाषेत सांगायचे झाल्यास हिमनदी व खडक कोसळल्यामुळे निर्माण झालेला भूगर्भीय धक्का आणि पूरप्रवाह होता.
वास्तविक पाहता हिमालय ही जगातील सर्वात तरुण आणि भव्य पर्वतरांगांपैकी एक आहे. हिमालय पर्वताची एकूण लांबी अंदाजे २४०० ते २५०० किलोमीटर आहे. ही पर्वतश्रेणी पश्चिमेकडे सिंधू नदीच्या वळणापासून (नंगा पर्वत) पूर्वेकडे ब्रह्मपुत्रा नदीच्या वळणापर्यंत (नामचा बरवा शिखरापर्यंत) एका चापाच्या (Arc) आकारात पसरलेली आहे. हिमालयाची रुंदी साधारणपणे १५० ते ४०० किलोमीटर इतकी असून हा पर्वत प्रामुख्याने भारत, नेपाळ, भूतान, चीन आणि पाकिस्तान या ५ मुख्य देशांमध्ये पसरलेला आहे. त्याचबरोबर हा प्रदेश जगातील सर्वाधिक भूगर्भीयदृष्ट्या सक्रिय आणि पर्यावरणाच्या दृष्टीने नाजूक प्रदेशांपैकी एक आहे. भारतीय आणि युरेशियन भू-पट्ट्यांची सतत होणारी हालचाल, तीव्र उतार, कमजोर खडकांची रचना, मुसळधार पाऊस, वाढत्या वैश्विक तापमानाचा हिमनद्यांवर होणारा परिणाम आणि वाढता मानवी हस्तक्षेप यामुळे हिमालय भूकंप, भूस्खलन, फ्लॅश फ्लड, हिमस्खलन आणि हिमनदीजन्य पुरांसारख्या आपत्तींसाठी अधिक संवेदनशील झाला आहे. एकविसाव्या शतकात ही अस्थिरता अधिकच प्रकर्षाने जाणवू लागली आहे.
या अस्थिरतेची कारणमीमांसा लक्षात घेतली, तर आपल्या असे लक्षात येईल की हिमालयाच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात हालचाली होत असून या हालचाली सामान्यतः नैसर्गिक आहेत. भारतीय भू-पट्टा अजूनही युरेशियन भू-पट्ट्याकडे सरकत आहे. या हालचालीमुळे प्रचंड भूगर्भीय दाब निर्माण होतो. त्यामुळे हिमालयीन पट्टा अत्यंत भूकंपप्रवण असून, या धक्क्यांमुळे मोठ्या भूस्खलनासारख्या आपत्ती उद्भवतात. हवामान बदल ही देखील एक गंभीर चिंता आहे. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ आणि हिमनद्यांचे वितळणे दिवसेंदिवस वाढत आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार आगामी वर्षे मानवी इतिहासातील सर्वाधिक उष्ण ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचबरोबर पर्जन्यमानातील लहरीपणा आणि कमी वेळात होणारी अतिवृष्टी (Cloudburst) यामुळे भूस्खलन, दरडी कोसळणे, गाळाचे प्रवाह आणि पुराचा धोका कित्येक पटीने वाढतो.
वरील सर्व गोष्टी नैसर्गिक असल्या, तरी दिवसेंदिवस मानवाचा हस्तक्षेप हिमालयामध्ये प्रचंड वाढताना दिसून येत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे हिमालयाची नैसर्गिक स्थिरता ढासळत आहे. जंगलतोड, अनियोजित काँक्रीटचे बांधकाम, खाणकाम, पर्यटनाचा प्रचंड ताण, डोंगरउतार कापून रस्ते तयार करणे आणि अस्थिर उतारांवर अवाढव्य पायाभूत सुविधा उभारणे यामुळे पर्वतांच्या नैसर्गिक संतुलनाला धक्का पोहोचत आहे. रस्ते आणि बोगदे बांधताना नैसर्गिक पाण्याचा निचरा विस्कळीत झाल्यामुळे भूस्खलनाचा धोका आणखी वाढतो.
याचे परिणाम अत्यंत विनाशकारी ठरू शकतात. भूस्खलन आणि अचानक आलेले पूर यामुळे गावे, रस्ते, पूल, शाळा, रुग्णालये आणि दळणवळणाची साधने अल्पावधीत उद्ध्वस्त होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, लोकांचे विस्थापन आणि प्रचंड आर्थिक नुकसान होते. हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या आशियातील कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा मुख्य आधार आहेत. त्यामुळे पर्वतीय भागातील नैसर्गिक आपत्तींचा परिणाम केवळ त्या एका प्रदेशापुरता मर्यादित राहत नाही; तर शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, जलविद्युत निर्मिती, वाहतूक, पर्यटन आणि संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्था या चक्रात भरडली जाते. जंगलतोड, मृदा धूप आणि नैसर्गिक अधिवासांचा नाश यामुळे जैवविविधता वेगाने नष्ट होत असून पर्वतीय परिसंस्थेची नैसर्गिक प्रतिकारक्षमता घटत आहे.
याचा अर्थ मानवी विकास थांबवणे असा मुळीच होत नाही. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली, तरी हिमालयात हा विकास वैज्ञानिक, शाश्वत आणि पर्यावरणपूरक पद्धतीनेच झाला पाहिजे. सर्वात प्रथम डोंगरउतारांवर काँक्रीटच्या बहुमंजिली इमारतींचे बांधकाम तातडीने थांबवणे गरजेचे आहे. बांधकामासाठी शक्यतो स्थानिक व पर्यावरणपूरक घटकांचा वापर करावा. रस्ते, बोगदे आणि धरणे उभारण्यापूर्वी सखोल भूगर्भीय व पर्यावरणीय मूल्यमापन (EIA) अनिवार्य केले पाहिजे. स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास मातीची धूप थांबून उतार स्थिर राहण्यास मदत होईल. तसेच ओढे, नाले आणि नद्यांचे नैसर्गिक जलप्रवाह अडवणे किंवा ते अनैसर्गिकरीत्या वळवणे पूर्णपणे थांबवले पाहिजे.
अतिवृष्टी, भूस्खलन आणि पूर यांसारख्या धोक्यांची पूर्वकल्पना मिळण्यासाठी आधुनिक ‘अर्ली वॉर्निंग सिस्टिम’ (Early Warning System) सीमावर्ती आणि दुर्गम भागात वेगाने कार्यान्वित करणे काळाची गरज आहे. सोबतच हिमालयाची पर्यावरणीय वहनक्षमता (Carrying Capacity) लक्षात घेऊनच जबाबदार आणि मर्यादित पर्यटनाला मुभा दिली गेली पाहिजे.
थोडक्यात सांगायचे तर हिमालय हा केवळ एक भौगोलिक प्रदेश नसून संपूर्ण आशिया खंडाचा प्राण आणि पाण्याचा मुख्य स्रोत आहे. भूकंप किंवा हिमनदी कोसळण्यासारख्या नैसर्गिक घडामोडी पूर्णपणे रोखणे मानवाच्या हातात नसले, तरी वैज्ञानिक नियोजन, जबाबदार विकास, पूर्वसूचना यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या जोरावर जीवित व वित्तहानी नक्कीच टाळता येऊ शकते. हिमालयाला आज बेफाम काँक्रीटीकरणाची नव्हे, तर सुजाण आणि शाश्वत विकासाची गरज आहे. निसर्गाच्या मर्यादांचा आदर राखला, तरच उद्याच्या पिढ्यांचे पाणी, पर्यावरण आणि अस्तित्व सुरक्षित राहील.
