आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

सोलगाव परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना चैतन्य फाउंडेशनचा आधार

शैक्षणिक साहित्य वितरण समारंभ उत्साहात.

सोलगाव परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना चैतन्य फाउंडेशनचा आधार ; शैक्षणिक साहित्य वितरण समारंभ उत्साहात.

राजापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आर्थिक अडचणींमुळे कोणताही गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सोलगाव परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा शैक्षणिक साहित्य वितरण समारंभ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, सोलगाव नं. १ येथे उत्साहात संपन्न झाला.

​फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रथमेश तेंडुलकर यांच्या संकल्पनेतून हा समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनच्या संचालिका सौ. दिपाली तेंडुलकर उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईतील शिक्षणप्रेमी व समाजसेवक श्री. सुधीर तेंडुलकर, श्रीमती अंजली तेंडुलकर, रिया देसाई, तसेच सोलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. तनिष्का तिर्लोटकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. दिलीप थोटम, सौ. वेदिका तरळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रामदास गुरव व श्री. लक्ष्मण नांगरेकर, तसेच श्री. राजाराम गुरव व सौ. प्राची कुळये उपस्थित होते.

​यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा सुयोग्य वापर करून विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा, ज्ञानात भर घालावी आणि भविष्यात यशस्वी होऊन समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून त्यांच्या मनात शिक्षणाविषयी नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

​कार्यक्रमाचे नेटके नियोजन सोलगाव शाळा क्र. १, २ व ३ मधील शिक्षकवृंदाने संयुक्तपणे केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. विठ्ठल मंगे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. संभाजी पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास परिसरातील पालक, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??