आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

ग्रंथपाल भरती तातडीने सुरू करण्याची मागणी; कोल्हापूरमध्ये ग्रंथपालांचे निवेदन अभियान

ग्रंथपाल भरती तातडीने सुरू करण्याची मागणी; कोल्हापूरमध्ये ग्रंथपालांचे निवेदन अभियान

कोल्हापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त ग्रंथपाल पदांची भरती तातडीने सुरू करावी, भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी तसेच प्रत्येक ५०० विद्यार्थ्यांमागे किमान एक ग्रंथपाल नियुक्त करण्याचा शासन निर्णय त्वरित अंमलात आणावा, या प्रमुख मागण्यांसाठी ग्रंथपाल भरती संघर्ष समितीच्या वतीने रविवारी शाहू स्मारक, कोल्हापूर येथे चर्चा सत्र व निवेदन अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शासनाकडे सादर करण्यात येणाऱ्या सविस्तर निवेदनावर मान्यवरांनी मार्गदर्शन करत ग्रंथपाल भरतीचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या वेळी बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. देविदास पंडगळे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महासंघाचे सरचिटणीस श्री. शिवाजीराव खांडेकर आणि सौ.प्रिया पवार उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ उपस्थित होते. त्यांनी अनेक वर्षांपासून ग्रंथपाल पदभरती रखडल्याने पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे सांगत शासनाने तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली.

यावेळी वक्त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) मध्ये वाचन संस्कृती, स्वयंअध्ययन, डिजिटल संसाधनांचा वापर आणि माहिती साक्षरता यावर विशेष भर देण्यात आला आहे. मात्र राज्यातील अनेक शाळांमध्ये प्रशिक्षित ग्रंथपाल उपलब्ध नसल्याने या उद्दिष्टांच्या पूर्ततेत अडथळे निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांना सक्षम ग्रंथालय सेवा, संदर्भ सुविधा, वाचन प्रेरणा आणि डिजिटल माहितीपर्यंत सहज प्रवेश मिळण्यासाठी प्रत्येक शाळेत प्रशिक्षित ग्रंथपालाची नियुक्ती आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

निवेदनात रिक्त ग्रंथपाल पदांची तातडीने भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबविणे, ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयाच्या पात्र उमेदवारांना प्राधान्य, दीर्घकाळ भरती न झाल्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष सवलत, प्रत्येक ५०० विद्यार्थ्यांमागे किमान एक ग्रंथपाल नियुक्ती तसेच राज्यातील शाळांमध्ये सक्षम व डिजिटल ग्रंथालय व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करण्यात आली.

कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रंथपाल, ग्रंथपाल पदासाठी पात्र उमेदवार, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि वाचन संस्कृतीच्या विकासासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??