पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’चा शुभारंभ
पहिल्याच टप्प्यात ५ हजार २९ कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’चा शुभारंभ; पहिल्याच टप्प्यात ५ हजार २९ कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात!
मुंबई: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
राज्यातील बळीराजाला दिलासा देण्यासाठी आणि शेती क्षेत्राला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ च्या प्रत्यक्षात अमलबजावणीला आता सुरुवात झाली आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका विशेष आढावा बैठकीत या योजनेच्या ऑनलाइन लाभ वितरणाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच टप्प्यात राज्यातील ६ लाख २२ हजार २०७ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट ५ हजार २९ कोटी रुपयांची भरघोस रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, शेतीला समृद्धीच्या मार्गावर नेणे आणि पर्यायाने राज्याच्या विकासाला गती देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी स्पष्ट केले. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे, त्यांच्या कर्जखात्यांवर ही रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी तातडीने नवे पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने सर्व बँकांना दिले आहेत. यामुळे बळीराजाला येत्या हंगामात शेतीकामांसाठी लागणारे आर्थिक बळ वेळेत उपलब्ध होणार आहे.
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयाचे चक्कर मारण्याची किंवा कुठलाही अर्ज भरण्याची गरज पडणार नाही. महाआयटीने विकसित केलेल्या विशेष पोर्टलवर बँकांनी पात्र लाभार्थ्यांची यादी आधीच अपलोड केली आहे. हीच यादी आता गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी केवळ हा क्रमांक घेऊन जवळच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर जायचे आहे, तेथे ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी पूर्ण करून आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे, अशा अत्यंत सरळ आणि सोप्या पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात आहे.
पहिल्या टप्प्यातील विभागनिहाय वितरणाचा आढावा घेतला असता, अमरावती विभागातील सर्वाधिक १ लाख ५८ हजार १४६ शेतकऱ्यांना १३७२.१७ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. नाशिक विभागात १ लाख ४० हजार ८९ शेतकऱ्यांना १२०९.३९ कोटी रुपये, तर छत्रपती संभाजीनगर विभागात १ लाख ३० हजार ९३४ शेतकऱ्यांच्या खात्यात ९३२.६१ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. याशिवाय पुणे विभागात १ लाख ४ हजार ६१ शेतकऱ्यांना ८६०.९७ कोटी, नागपूर विभागात ७० हजार २९० शेतकऱ्यांना ५४४.७१ कोटी आणि कोकण विभागात १८ हजार ६८७ शेतकऱ्यांना १०८.८६ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे.
ज्या भागांमध्ये शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणी येत असतील किंवा स्थानिक पातळीवर काही प्रश्न प्रलंबित असतील, त्याबाबतीत सर्व पालकमंत्र्यांनी तत्काळ माहिती गोळा करून ती शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अशा सर्व विषयांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचे सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्री गिरीष महाजन, संजय सावकारे, पंकजा मुंडे, शंभूराज देसाई, दत्तात्रय भरणे, बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य सरकारच्या या धोरणात्मक निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, शेती क्षेत्रातील थकबाकीचे सावट दूर होण्यास मदत होणार आहे.




