ईओएस-०५’ उपग्रहाचे श्रीहरिकोटावरून यशस्वी उड्डाण इस्रोची ऐतिहासिक भरारी

ईओएस-०५’ उपग्रहाचे श्रीहरिकोटावरून यशस्वी उड्डाण इस्रोची ऐतिहासिक भरारी
वृत्तसेवा :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अंतराळ मोहिमेत आणखी एक ऐतिहासिक सुवर्णक्षण नोंदवला आहे. आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण तळावरून ‘जीएसएलव्ही-एफ१७’ (GSLV-F17) या प्रक्षेपकाच्या साहाय्याने ‘ईओएस-०५’ (EOS-05) या अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे पहाटे २ वाजून ५५ मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. अवघ्या १८ मिनिटांत रॉकेटने या उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत अचूकपणे स्थापित करून मोहिमेचे पहिले उद्दिष्ट पूर्ण केले.
सुमारे २ हजार ३६७ किलो वजनाचा हा उपग्रह भूस्थिर कक्षेत (Geosynchronous Orbit) कार्यरत राहणारा भारताचा पहिला अत्याधुनिक इमेजिंग उपग्रह ठरणार आहे. पृथ्वीपासून साधारण ३६ हजार किलोमीटर उंचीवरून हा उपग्रह कार्यरत राहील. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीशी उपग्रहाची गती सुसंगत राहणार असल्याने, हा उपग्रह २४ तास भारतीय उपखंड आणि सीमेवर करडी नजर ठेवण्यास सक्षम असेल. संरक्षण तज्ज्ञांनी या उपग्रहाला भारताचा अंतराळातील ‘तिसरा डोळा’ असे संबोधले आहे.
या मोहिमेमुळे देशाच्या आपत्ती व्यवस्थापन, हवामान अंदाज, शेती आणि पर्यावरण संरक्षणाला मोठी ताकद मिळणार आहे. चक्रीवादळे, पूरस्थिती, ढगफुटी, जंगलातील वणवे यांसारख्या नैसर्गिक संकटांची अतिशय सूक्ष्म आणि रिअल-टाइम छायाचित्रे दर अर्ध्या तासाला नियंत्रण कक्षाकडे पाठवणे या उपग्रहामुळे शक्य होईल. याशिवाय देशाच्या सागरी सीमा, दुर्गम भूभाग आणि संवेदनशील सीमावर्ती भागांवर निरंतर देखरेख ठेवण्यासाठी लष्कराला या उपग्रहाच्या माहितीचा मोठा आधार मिळणार आहे.
प्रक्षेपणाच्या यशानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. मोहिमेचे यश हे इस्रोच्या संपूर्ण चमूचे आणि भारतीय उद्योगांचे एकत्रित फळ असल्याची प्रतिक्रिया इस्रोच्या प्रमुखांनी दिली. जीएसएलव्ही मोहिमेच्या इतिहासातील ही एक अत्यंत महत्त्वाची झेप मानली जात असून, भारताने पुन्हा एकदा अंतराळ तंत्रज्ञानात जगाला आपली अचूकता आणि क्षमता दाखवून दिली आहे.




