जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त ; ११ कोटींचे हेरॉइन जप्त, म्होरक्यासह तिघांना बेड्या

जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त ; ११ कोटींचे हेरॉइन जप्त, म्होरक्यासह तिघांना बेड्या
जम्मू : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
सीमापार सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात धडक मोहीम राबवत अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. जम्मूतील पंजतीर्थी परिसरात एनसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ५.१६० किलो उच्च दर्जाचे हेरॉइन जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे ११ कोटी रुपये इतकी आहे. या कारवाईत एका वाहनासह तिघांना अटक करण्यात आली असून, यामध्ये संपूर्ण रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराचाही समावेश आहे.
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे एनसीबीच्या जम्मू पथकाने २२ ऑगस्ट रोजी पंजतीर्थी भागात नाकाबंदी करून एका संशयित वाहनाला अडवले. या वाहनाची कसून झडती घेतली असता लपवून ठेवलेला ५.१६० किलो हेरॉइनचा साठा सापडला. या प्रकरणी वाहनातील दोघांना जागीच ताब्यात घेण्यात आले. हे दोघेही बारामुल्ला येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.
प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, हे अंमली पदार्थ पाकिस्तानमधून उरी सीमाभागातून भारतात पाठवण्यात आल्याचा संशय आहे. या तस्करीत बारामुल्ला येथील आणखी एका व्यक्तीचा मुख्य हात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. केवळ कुरिअरवर कारवाई न करता संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने एनसीबीने तात्काळ तपास चक्र वेगाने फिरवली. हा मुख्य सूत्रधार लडाखमधील लेह भागात लपून बसल्याचे समजताच एनसीबीच्या पथकाने तेथे छापा टाकून २४ ऑगस्ट रोजी त्याला बेड्या ठोकल्या.
प्राथमिक तपासानुसार हे रॅकेट सीमापार नेटवर्कशी थेट जोडलेले आहे. या रॅकेटचे आर्थिक व्यवहार (हवाला), स्थानिक वाहतूकदार, स्थानिक हस्तक आणि अंमली पदार्थांचे वितरण नेटवर्क या सर्वांची पाळेमुळे शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
दरम्यान, एनसीबीच्या जम्मू युनिटने चालू महिन्यात केलेली ही तिसरी मोठी कारवाई ठरली आहे. यापूर्वी १२ ऑगस्ट रोजी ४३८ ग्रॅम आणि १३ ऑगस्ट रोजी ६०३ ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले होते. देशभरात अंमली पदार्थांचे जाळे समूळ नष्ट करण्यासाठी नागरिकांनी अशा गैरप्रकारांबाबत कोणतीही माहिती असल्यास ‘मानस’ (१९३३) या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.




