नेपाळ-चीन सीमेवर जलप्रलय; मृतांची संख्या ३१ वर, १०० हून अधिक भारतीयांसह शेकडो पर्यटक बेपत्ता, बिहार-उत्तर प्रदेशात हाय अलर्ट

ब्रेकिंग न्यूज

नेपाळ-चीन सीमेवर जलप्रलय; मृतांची संख्या ३१ वर, १०० हून अधिक भारतीयांसह शेकडो पर्यटक बेपत्ता, बिहार-उत्तर प्रदेशात हाय अलर्ट
काठमांडू / नवी दिल्ली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
नेपाळ आणि तिबेट (चीन) सीमेवर भूकंपाच्या धक्क्यानंतर आलेल्या महाकाय पुराने सीमेवरील अनेक गावे अक्षरशः उद्ध्वस्त केली असून आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत ३८० हून अधिक पर्यटक आणि स्थानिक नागरिक बेपत्ता असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता पर्यटकांमध्ये १०५ भारतीय नागरिक आणि ३७ अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. यातील बहुतांश भारतीय भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. उर्वरित पर्यटकांमध्ये अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांचा समावेश आहे.
नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी तिबेटच्या भागात बसलेल्या ४.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे लेन्दे नदीच्या खोऱ्यात प्रचंड मोठे हिमस्खलन झाले. या भूस्खलनामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह काही काळ अडवला गेला आणि नंतर नैसर्गिक सरोवराचा बांध फुटल्याप्रमाणे पाण्याचा प्रचंड लोंढा थेट भोटे कोशी नदीत धडकला. स्थानिक पातळीवर कोणताही पाऊस नसताना अचानक आलेल्या या पाण्याच्या महाकाय प्रवाहाने सीमेवरील तिमुरे, स्याफ्रूबेसी या भागांतील रस्ते, पूल, गावे आणि घरे क्षणात गिळंकृत केली. नेपाळ-चीनमधील मुख्य व्यापार नाका असलेले प्रसिद्ध ‘रासुवागढी’ सीमाशुल्क कार्यालय पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.
या पुराचा मोठा फटका तिबेटच्या बाजूलाही बसला असून चीनचे प्रमुख व्यापारी केंद्र मानले जाणारे ‘गीरोंग पोर्ट’ (Gyirong Port) चिखल आणि ढिगाऱ्याखाली गेले आहे. तेथेही मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची शक्यता चिनी सरकारी माध्यमांनी वर्तवली असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तातडीने पूर्ण क्षमतेने बचावमोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.
नेपाळमध्ये लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. पुराच्या पाण्यात घरे आणि इमारती बुडाल्याने छतांवर अडकलेल्या नागरिकांना लष्कराच्या १४ हेलिकॉप्टर्सद्वारे सुरक्षित बाहेर काढले जात आहे. दरम्यान, तिमुरे सीमा चौकीवर तैनात असलेले नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलाचे ९ जवानही या पुरात बेपत्ता झाले आहेत. याशिवाय रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यातील रसुवागढी, चिलिमे, त्रिशुली ३ए यासह सहा प्रमुख जलविद्युत केंद्रांचे मोठे नुकसान झाल्यामुळे देशातील ४३० मेगावॉट वीजपुरवठा खंडित झाला आहे.
भोटे कोशी नदीतील पुराचा लोंढा त्रिशुलीमार्गे भारतात गंडक नदीच्या रूपात प्रवेश करत असल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. केंद्रीय जल आयोगाने खबरदारीचा इशारा दिल्यानंतर बिहारमधील पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, सुपौल, अररिया, किशनगंज आणि उत्तर प्रदेशातील महाराजगंज, कुशीनगर या जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करून नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (SSB) ११ मदत व बचाव तुकड्या सीमेवर तैनात करण्यात आल्या असून ७ अतिरिक्त तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
आपत्तीत अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी नेपाळमधील भारतीय दूतावासाने +९७७ ९८५ १३१ ६८०७ आणि +९७७ ९७० ९१० ७५०० हे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. तसेच नेपाळ पर्यटन मंडळाने १२३४ हा टोल-फ्री क्रमांक, ११४४ ही हेल्पलाईन आणि ९८५१२८९४४५ हा पर्यटक पोलीस संपर्क क्रमांक सुरू केला आहे.




