आपला जिल्हाताज्या घडामोडी

प्रतीक्षा संपली! कोल्हापुरात ‘पीएम ई-बस’ची यशस्वी चाचणी

कोल्हापूरकरांचा प्रवास होणार प्रदूषणमुक्त आणि सुखकर

प्रतीक्षा संपली ! कोल्हापुरात ‘पीएम ई-बस’ची यशस्वी चाचणी

कोल्हापूरकरांचा प्रवास होणार प्रदूषणमुक्त आणि सुखकर

कोल्हापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि प्रवाशाभिमुख करण्याच्या दृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. केंद्र सरकारच्या ‘पीएम-ई बस सेवा’ योजनेअंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसची प्रत्यक्ष रस्ता चाचणी शहरातील प्रमुख मार्गांवर यशस्वीरीत्या पार पडली. यामध्ये १२ मीटर आणि ९ मीटर लांबीच्या अशा दोन स्वतंत्र बसेसचा समावेश असून, प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही संपूर्ण तपासणी पूर्ण करण्यात आली.

​महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार या चाचणीचे नियोजन करण्यात आले होते. शहरातील रस्त्यांची रचना, भौगोलिक स्थिती आणि गर्दीच्या ठिकाणांचा विचार करून स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले. त्यानुसार १२ मीटर लांबीच्या मोठ्या बसची चाचणी आर. के. नगर येथील स्वयंभू गणेश मंदिर ते कसबा बावडा या मार्गावर घेण्यात आली. तर अंतर्गत भागातील वळणे आणि वर्दळीच्या रस्त्यांवर उपयुक्त ठरणाऱ्या ९ मीटर बसची चाचणी बोंद्रे नगर ते मध्यवर्ती एस.टी. स्टँड, शाहू मैदान, राजारामपुरी मार्गे ऐतिहासिक गंगावेश या मुख्य मार्गावर घेण्यात आली.

​या चाचणीदरम्यान शहरातील प्रमुख वाहतूक सिग्नल, गर्दीची ठिकाणे, बस थांबे, रस्त्यांची स्थिती, चढ-उतार आणि स्पीड ब्रेकर्सवर वाहनाचे नियंत्रण कसे राहते, याचे बारकाईने तांत्रिक मूल्यमापन करण्यात आले. बसची वळण क्षमता, ब्रेक यंत्रणा, वातानुकूलन आणि प्रवाशांची सुरक्षितता या घटकांची तज्ज्ञांकडून पाहणी झाली. परिवहन समितीचे सभापती सत्यजित जाधव आणि अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी स्वतः या बसेसमधून प्रवास करत प्रत्यक्ष वाहतूक संचालनाचा आढावा घेतला आणि चालक व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

​या मोहिमेदरम्यान सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, बस उत्पादक जेबीएम कंपनीचे प्रतिनिधी सचिन साळुंखे, हंसाचे प्रतिनिधी ऋषिकेश शिंदे तसेच चाचणी चालक रवींद्र बोडके व नितीन ढेरे उपस्थित होते. इलेक्ट्रिक प्रणालीमुळे या बसेस चालवणे अत्यंत सुलभ असून, आवाज आणि कंपने अजिबात नसल्यामुळे चालकासह प्रवाशांचा प्रवासही अत्यंत सुखकर होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

​गेल्या काही काळापासून केएमटीच्या ताफ्यात नव्या आणि पर्यावरणपूरक बसेस दाखल होण्याची प्रतीक्षा कोल्हापूरकर करत होते. या ई-बसेसमुळे शहरातील हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार आहे. आता शिल्लक असलेल्या सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून लवकरच या दोन्ही प्रकारच्या बसेस सर्वसामान्य प्रवाशांच्या नियमित सेवेत रुजू केल्या जाणार आहेत.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??