आपला जिल्हाताज्या घडामोडी

गोकुळ’च्या आखाड्यात आजपासून प्रत्यक्ष लढाई!

उमेदवारासोबत फक्त एकालाच प्रवेश ; रमणमळ्यात प्रशासनाचा कडक पहारा

गोकुळ’च्या आखाड्यात आजपासून प्रत्यक्ष लढाई !

उमेदवारासोबत फक्त एकालाच प्रवेश ; रमणमळ्यात प्रशासनाचा कडक पहारा

कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) २५ जागांसाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून (ता. १५) सुरुवात होत आहे. यासाठी रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय सुरू करण्यात आले असून, नामनिर्देशन प्रक्रिया शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अर्ज भरताना होणारी संभाव्य गर्दी आणि वाहनांची कोंडी लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखा आणि निवडणूक विभागाने परिसरात वाहतुकीचे कडेकोट नियोजन केले आहे.  

​निवडणूक कार्यक्रमानुसार १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. २३ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, २४ सप्टेंबरला वैध नामनिर्देशनपत्रांची यादी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ८ ऑक्टोबरपर्यंत मुदत असून, ९ ऑक्टोबर रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. १८ ऑक्टोबरला मतदान आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १९ ऑक्टोबरला मतमोजणी पार पडेल. अर्ज स्वीकारण्यासाठी बहुउद्देशीय हॉलमध्ये एकूण नऊ टेबल सज्ज ठेवण्यात आले आहेत. यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघासाठी पाच आणि चार राखीव प्रवर्गांसाठी प्रत्येकी एक असे चार स्वतंत्र टेबल असतील. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी करवीरच्या उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्यासह ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

​नामनिर्देशन कक्षात अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्र सादर करताना उमेदवारासोबत केवळ सूचक आणि एका व्यक्तीलाच कक्षात प्रवेश दिला जाणार आहे. रमणमळा परिसर हा प्रामुख्याने निवासी भाग असल्याने स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन हालचालींना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवामुळे पोलीस आणि वाहतूक यंत्रणेवर आधीच ताण आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि समर्थकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी चौगुले यांनी केले आहे.

​अर्ज दाखल करण्याच्या काळात वाहनांची मोठी वर्दळ होण्याची शक्यता असल्याने वाहतूक शाखेने विशेष मार्ग नियोजन केले आहे. स्थानिक नागरिक, निवडणूक कर्मचारी आणि उमेदवारांची वाहने वगळता ड्रीम वर्ल्डच्या मागील रस्त्याने धोबीघाटाकडे जाणारी वाहतूक नियंत्रित करण्यात आली आहे. तसेच पवार बंगल्याकडून धान्य गोदामाकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. निवडणूक कर्मचारी व शासकीय वाहनांसाठी हॉलच्या उजव्या बाजूला, तर लोकप्रतिनिधींसाठी डाव्या बाजूला वाहनतळ निश्चित करण्यात आले आहे. उमेदवारांची वाहने धोबीघाटासमोरील मोकळ्या जागेत पार्क केली जातील, तर समर्थकांच्या वाहनांसाठी पोस्ट ऑफिस ते पितळी गणपती मार्गावरील रस्त्याच्या कडेला व्यवस्था करण्यात आली आहे. निर्धारित जागेव्यतिरिक्त इतरत्र वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

​दरम्यान, अंतिम मतदार यादीतील कायदेशीर पेचाची पार्श्वभूमी या निवडणुकीला लाभली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ४८ संस्थांचा अंतिम मतदार यादीत समावेश करण्यात आल्याने मतदारांची संख्या ५ हजार ३३२ वरून ५ हजार ३८० इतकी झाली आहे. दुसरीकडे अवसायनातील संस्थांच्या मताधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेचा निर्णय प्रलंबित असल्याने संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे. दोन्ही प्रमुख आघाड्यांकडून उमेदवारांची चाचपणी युद्धपातळीवर सुरू असल्याने मंगळवारपासून कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातील घडामोडींना मोठा वेग येणार आहे.

https://nynavabharatnews.online

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??