वृद्धेच्या अंगावरील दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला ; महाडिकवाडीत मध्यरात्री दोन चोरट्यांचा धुमाकूळ. पाच लाखांची चोरी.

वृद्धेच्या अंगावरील दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला ; महाडिकवाडीत मध्यरात्री दोन चोरट्यांचा धुमाकूळ. पाच लाखांची चोरी.
पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
महाडिकवाडी (ता. पन्हाळा) येथे मध्यरात्री घरात घुसलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी ८० वर्षीय वृद्ध महिलेचे हात व तोंड पांढऱ्या कापडी पट्ट्याने बांधून तिच्या अंगावरील सुमारे पाच लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लंपास केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १२) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सरदार बापू महाडिक यांच्या महाडिकवाडी येथील घरात रात्री एक ते दोनच्या दरम्यान दोन अनोळखी इसम उघड्या दरवाजातून शिरले. घरात असलेल्या इंदुबाई महाडिक यांच्या हाताला व तोंडाला कापडी पट्टे बांधून चोरट्यांनी त्यांच्या हातातील सोन्याच्या पाटल्या जबरदस्तीने ओढून काढल्या. यामध्ये त्यांच्या मनगटाजवळ तसेच तोंडाजवळ दुखापत झाली.
चोरट्यांनी चार तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या, अर्ध्या तोळ्याचे मंगळसूत्र आणि अर्ध्या तोळ्याच्या कुड्या-बुगडी, असे एकूण पाच तोळे वजनाचे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले. घटनेच्या वेळी घरात इंदुबाई महाडिक यांच्यासह त्यांचे ९० वर्षीय पतीही उपस्थित होते.
दरम्यान, वृद्ध महिलेच्या अंगावर एवढे सोन्याचे दागिने असल्याची माहिती चोरट्यांना नेमकी कशी मिळाली? हा प्रश्न या घटनेनंतर ऐरणीवर आला आहे. चोरट्यांनी आधीपासून घरावर पाळत ठेवली होती का, अथवा घरातील परिस्थिती व दागिन्यांची माहिती असलेली व्यक्ती या प्रकारात सहभागी आहे का, याबाबत परिसरात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या चर्चेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
वृद्ध महिलेला लक्ष्य करून करण्यात आलेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांचा माग काढून या घटनेचा छडा लावणार का ? याकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे. पन्हाळा पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.





