ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता काबीज करणे गरजेचे : प्रा.नागोराव पांचाळ.

वेरूळ येथे विश्वकर्मा प्रकट दिन व समाज मेळावा संपन्न. 

समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता काबीज करणे गरजेचे : प्रा.नागोराव पांचाळ.

वेरूळ येथे विश्वकर्मा प्रकट दिन व समाज मेळावा संपन्न. 

छत्रपती संभाजीनगर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

आगामी काळात सुतार, लोहार, शिल्पकार, सोनार, तांबट या अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे सत्ता असणे आवश्यक आहे. सत्ता मिळवण्यासाठी आपण समाजकारणाबरोबरच राजकारण केले पाहिजे आणि सत्तेत सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नागोराव पांचाळ यांनी केले.

विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या वतीने श्रीक्षेत्र वेरूळ येथील विश्वकर्मा मंदिराच्या प्रांगणात आयोजित समाज मेळाव्यात ते बोलत होते. श्री विश्वकर्मा मंदिराचे पुजारी महेंद्र बापूजी, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, युवा आघाडीचे नेते अमित भुईगळ, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव, उद्योजक पराग अहिरे, संघटनेचे प्रदेशाध्यक सचिन सुतार, कार्याध्यक्ष अरुण भालेकर, सरचिटणीस संजय सुतार, राज्य उपाध्यक्ष गोपाल राऊत, महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा शुभदाताई धामापूरकर, उपाध्यक्ष धनराज वेलणकर, राजेश नागपुरे, राज्य संघटक राजकुमार राऊत, सचिव विलास पवार, राज्य प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत, महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योगाचे अल्ताफ शेख, जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ महाराष्ट्राचे अजित मुंडे, वेरूळ शाखेचे व्यवस्थापक सौरव कुमार आदी मान्यवर यावेळी विचारपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. नागोराव पांचाळ पुढे म्हणाले की, विश्वकर्मा वंशीय समाजाच्या अधिवेशनाला यंदा १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. १२ वर्षात समाजामध्ये जनजागृती करत असतानाच समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्याचा संघटनेने प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मात्र भविष्य काळामध्ये समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस कृती कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. त्यामध्ये समाजात उद्योजक घडविणे, कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देणे, ए. आय. तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम आत्मसात करणे त्याचबरोबर ॲनिमेशन, व्हि. एफ. एक्स, गेम प्रोजेक्शन या क्षेत्राकडे तरुण पिढीने लक्ष केंद्रित केले पाहिजे. व्यवसायासाठी मार्केटिंग, पॅकेजिंग सारख्या छोट्या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर भविष्यात आपल्याला जीवन जगण्यासाठी काय करावे याबाबत विचार होणे गरजेचे आहे. 

कार्यक्रमात प्राथमिक शिक्षक भाऊसाहेब राऊत, युवा उद्योजक पवन शेटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण लाटेकर, पुरोगामी चळवळीचे पुरस्कर्ते विष्णू गरुड, साहित्यिक चंद्रकांत पोतदार यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ह. भ. प. पद्मावती सुतार यांनी लिहिलेल्या ‘विराट स्वरूप श्री विश्वकर्मा’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी १ लाख रुपये कर्ज मंजुरीचे पत्र वितरित करण्यात आले.यावेळी राजेश नागपुरे, पराग अहिरे, अमित भुईगळ, ॲड. डॉ. अरुण जाधव, राजेंद्र पातोडे यांचीही भाषणे झाली. 

सकाळी नऊ वाजता प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक आणि सद्भावना ज्योत काढण्यात आली. सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्याध्यक्ष अरुण भालेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शुभदा धामापूरकर, भगवान राऊत, प्रसाद गडकर यांनी पुरस्कारार्थींच्या सन्मानपत्राचे वाचन केले. सरचिटणीस संजय सुतार व सचिव विलास पवार यांनी सूत्रसंचालन केले. सचिन सुतार यांनी मेळाव्या मागची भूमिका विशद केली. राजकुमार राऊत यांनी आभार मानले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल डोळस, किशोर शिरसाठ, परमेश्वर पांचाळ, सोमनाथ राऊत आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास पुणे, लातूर, बीड, अहिल्यानगर, अमरावती, नांदेड, कोकण, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??