सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आता आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी
तामिळनाडूत मुख्यमंत्री थलपती विजय सरकारची विशेष तयारी

सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आता आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी
तामिळनाडूत मुख्यमंत्री थलपती विजय सरकारची विशेष तयारी
चेन्नई : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
तामिळनाडूतील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दुपारच्या पोषण आहारात आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शालेय विद्यार्थ्यांमधील कुपोषण दूर करण्यासाठी आणि त्यांच्या आहारात प्रथिनांचे (प्रोटीन) प्रमाण वाढवण्यासाठी ही विशेष योजना आखली आहे. शालेय शिक्षणमंत्री राज मोहन यांनी या निर्णयाची माहिती दिली असून, मुख्यमंत्री विजय यांची तशी वैयक्तिक इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सदर योजना संपूर्ण राज्यात एकाच वेळी लागू न करता सुरुवातीला ती प्रायोगिक तत्त्वावर (पायलट प्रोजेक्ट) राबवली जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांसाठी मांसाहारी अन्न तयार करताना स्वच्छता, ताजेपणा आणि अन्न सुरक्षेचे कडक निकष पाळले जाणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वयंपाकघरांची स्थिती, अन्न शिजवण्याची पद्धत आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच या उपक्रमाचा राज्यभरात विस्तार करण्यात येईल.
शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही योजना कोणत्याही विद्यार्थ्यावर सक्तीची नसेल. जे विद्यार्थी शाकाहारी आहेत किंवा मांसाहार करत नाहीत, त्यांना सध्या मिळणारे सकस शाकाहारी जेवण पूर्वीप्रमाणेच नियमित दिले जाईल. केवळ मांसाहारी अन्नाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच चिकन बिर्याणीचा ऐच्छिक पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. पुझल मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना जर आहारात चिकन बिर्याणी मिळू शकते, तर देशाचे उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना पोषक अन्न का मिळू नये, असा सवाल उपस्थित करत शिक्षणमंत्र्यांनी या योजनेकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता शुद्ध पोषण क्रांती म्हणून पाहण्याचे आवाहन केले आहे.
तामिळनाडूला शालेय पोषण आहाराचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. देशात सर्वप्रथम १९५० च्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री के. कामराज यांनी शालेय माध्यान्ह भोजन योजनेची पायाभरणी केली होती. त्यानंतर दिवंगत मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी या आहारात अंड्यांचा समावेश केला, तर माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांनी याचे रूपांतर व्यापक ‘पौष्टिक भोजन कार्यक्रमात’ केले. दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी आठवड्यातील सर्व दिवस अंडी देण्याची सोय उपलब्ध करून दिली. आता याच परंपरेत एक पाऊल पुढे टाकत मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारने आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी देण्याचा प्रस्ताव आणला आहे. यासोबतच शाळांमधील सकाळच्या नाश्त्याचा दर्जा आणि मेन्यू सुधारण्यावरही सरकार भर देत आहे.




