आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

उच्च साखर उतारा विभागात ‘श्री दत्त शिरोळ’ सर्वोत्तम; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

उच्च साखर उतारा विभागात ‘श्री दत्त शिरोळ’ सर्वोत्तम; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

​शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा २०२४-२५ या गाळप हंगामातील उच्च साखर उतारा विभागातील देशपातळीवरील ‘सर्वोत्तम ऊस विकास’ या श्रेणीतील प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार शिरोळ येथील ‘श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्या’स प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीत आयोजित शानदार राष्ट्रीय समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारखान्याचे मार्गदर्शक व उद्यान पंडित गणपतराव पाटील आणि चेअरमन रघुनाथ पाटील यांनी हा बहुमान स्वीकारला.

 ​नवी दिल्लीतील या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यास माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह देशभरातील साखर उद्योगातील मान्यवर, साखर महासंघाचे पदाधिकारी आणि विविध राज्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते. भारत सरकारच्या मुख्य संचालकांच्या (साखर) अध्यक्षतेखालील राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ निवड समितीने देशभरातील कारखान्यांच्या तांत्रिक, आर्थिक व ऊस विकासाच्या कामगिरीचे सखोल मूल्यमापन केले होते. त्यात प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती आणि आव्हानात्मक हंगामातही दत्त कारखान्याने ऊस विकास क्षेत्रात राबवलेले उपक्रम देशात सर्वोत्कृष्ट ठरले.

 ​दत्त कारखान्याने स्वतंत्र ऊस विकास विभागामार्फत शेतकऱ्यांना जमिनीच्या मशागतीपासून ते थेट ऊस तोडणी आणि गाळपापर्यंत सर्वंकष मार्गदर्शन देण्याची सक्षम यंत्रणा उभी केली आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.२३ टक्क्यांवरून तब्बल ०.८७ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात कारखान्याने सलग दहा वर्षांच्या प्रयत्नांतून मोठे यश मिळवले आहे. यासोबतच कार्यक्षेत्रात २७ टक्के प्रमाणित बियाणे बदल, आधुनिक सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकर्‍यांच्या बांधावर मोफत माती, पाणी व पाने परीक्षण प्रयोगशाळा आणि शास्त्रोक्त सल्ला उपलब्ध करून दिला जात आहे. ऊसाच्या पाचटाचे जागेवरच व्यवस्थापन, रासायनिक खतांचा संतुलित वापर, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय खतांचा पुरवठा करून सेंद्रिय ऊस उत्पादन व त्याद्वारे सेंद्रिय साखर निर्मितीमध्ये कारखान्याने देशात वेगळा ठसा उमटवला आहे.

​शिरोळ आणि परिसरातील नदीकाठच्या क्षारपड व चोपण जमिनींची वाढती समस्या लक्षात घेऊन दत्त कारखान्याने दहा हजार एकरांवर आधुनिक ‘सचिद्र निचरा प्रणाली’ (सब-सरफेस ड्रेनेज) यशस्वीपणे राबवून नापीक जमिनी पुन्हा सुपीक केल्या. यामुळे कार्यक्षेत्रातील एकरी उत्पादनवाढीस मोठी गती मिळाली आहे. आज वाढते उत्पादन खर्च, मजुरांची टंचाई आणि लहरी हवामानामुळे ऊस शेती आव्हानात्मक बनली असताना, शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य देणे आणि उसाला योग्य मोबदला मिळवून देणे याला कारखान्याने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी वेळोवेळी शेतकरी मेळावे आणि शिवारफेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे धडे दिले जातात. या सर्वसमावेशक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याने सभासद शेतकरी, तोडणी वाहतूकदार आणि कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 ​या पुरस्कार वितरण सोहळ्यास कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अरुणकुमार देसाई, इंद्रजीत पाटील, बसगोंडा पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगु माने गावडे, ॲड. प्रमोद पाटील, महेंद्र बागे, ज्योतीकुमार पाटील, सुरेश कांबळे, विजय सूर्यवंशी, बाळासाहेब पाटील-हालसवडे, रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूर मिस्त्री, कार्यकारी संचालक संजीव देसाई, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना आणि ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??