आपला जिल्हाताज्या घडामोडी

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातील पोलिसांना रोटरी क्लब जयसिंगपूर ट्रेड सिटीकडून पौष्टिक आहाराची साथ

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातील पोलिसांना रोटरी क्लब जयसिंगपूर ट्रेड सिटीकडून पौष्टिक आहाराची साथ

जयसिंगपूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

शहरासह ग्रामीण भागात सध्या गणेशोत्सवाची मोठी धामधूम सुरू असून कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यावर अहोरात्र पहारा देणाऱ्या पोलीस बांधवांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात बंदोबस्तावर तैनात असणाऱ्या पोलीस आणि होमगार्ड जवानांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटीच्या वतीने पौष्टिक खाद्यपदार्थ तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. हे सर्व साहित्य परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक ज्ञानेश गवई यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्त करण्यात आले.

 ​जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत शहरासह परिसरातील सुमारे अकरा गावांचा समावेश आहे. उत्सव काळात गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्था राखताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण असतो. अनेकदा कर्तव्य बजावताना जेवणाची व पाण्याची आबाळ होते. ही बाब लक्षात घेऊन कर्तव्यावर असणारे जवान शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावेत या हेतूने चिक्की, राजगिरा लाडू, केळी आणि बाटलीबंद पाणी पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आले.

 ​या उपक्रमाबाबत माहिती देताना रोटरी क्लब ट्रेड सिटीचे अध्यक्ष संतोष खामकर यांनी सांगितले की, सण-उत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिक आनंदात उत्सव साजरा करत असताना पोलीस यंत्रणा मात्र स्वतःचे सण विसरून कर्तव्यावर असते. या काळात त्यांच्यावर कामाचा ताण अधिक असतो. हाच विचार करून सामाजिक जाणिवेतून बंदोबस्तावरील पोलिसांच्या आरोग्यासाठी हा सकस आहार व पाण्याची सोय करण्यात आली आहे.

 ​या प्रसंगी सेक्रेटरी महेश पाटील, खजिनदार राजू बलदवा, डॉ. अतिक पटेल, अर्चना विभुते, इम्तकाब मारूफ, निखिल खामकर, आप्पासाहेब कोळी, अमित वाडेकर, सतीश जाधव, असिफ देसाई, योगेश बलदवा, दीपक मडिवाळ, कुलदीप विभुते यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??