आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात ११ वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

स्वस्थ भविष्यासाठी आयुर्वेद' विषयावर मार्गदर्शन; ११० नागरिकांनी घेतला लाभ

गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात ११ वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

‘स्वस्थ भविष्यासाठी आयुर्वेद’ विषयावर मार्गदर्शन; ११० नागरिकांनी घेतला लाभ

​गारगोटी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

येथील उपजिल्हा रुग्णालयातील आयुष विभागाच्या वतीने ११ वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन आणि सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रम उत्साहात संपन्न झाले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात परिसरातील ११० नागरिकांनी उपस्थित राहून आयुर्वेद आणि निरोगी जीवनशैलीविषयी सविस्तर मार्गदर्शन घेतले.

​कार्यक्रमाची सुरुवात वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गडदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता शेट्टी यांनी प्रास्ताविक करताना भारतीय पारंपरिक आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचे महत्त्व स्पष्ट केले.

​’स्वस्थ भविष्यासाठी आयुर्वेद’ या संकल्पनेवर प्रमुख मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांतांवर प्रकाश टाकला. ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्, आतुरस्य विकार प्रशमनम्’ या सूत्राचा सविस्तर उहापोह करत त्या म्हणाल्या की, केवळ आजार झाल्यावर उपचार करणे इतकाच आयुर्वेदाचा मर्यादित हेतू नसून निरोगी व्यक्तीचे आरोग्य निरंतर टिकवून ठेवणे आणि रुग्णाला व्याधीमुक्त करणे ही या शास्त्राची खरी ताकद आहे. बदलत्या ऋतूनुसार आहार-विहारातील बदल, योग्य दिनचर्या आणि मानसिक संतुलन राखल्यास अनेक व्याधींपासून दूर राहता येते, असे त्यांनी सांगितले.

​वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गडदे यांनी दैनंदिन जीवनशैली, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक ताणतणाव मुक्तीचे उपाय यावर सविस्तर माहिती दिली. आधुनिक धावपळीच्या युगात पारंपरिक जीवनशैलीची जोड देणे कसे काळाची गरज बनले आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांसह पटवून दिले.

​कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. चौगले, डॉ. सूरज पेडणेकर, डॉ. सलोनी देसाई यांच्यासह रुग्णालयातील सर्व नर्सिंग स्टाफ आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम नियोजनबद्ध रीतीने पार पडला. उपस्थितांचे आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली खोत यांनी मानलेnynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??