अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून लॉजवर नराधमांचा अत्याचार
ईश्वरपुरात प्रचंड संताप एकाला बेड्या, दुसरा पसार

अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून लॉजवर नराधमांचा अत्याचार
ईश्वरपुरात प्रचंड संताप एकाला बेड्या, दुसरा पसार
ईश्वरपूर (सांगली) : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीला बहाण्याने लॉजवर नेऊन तिच्या शीतपेयातून गुंगीचे औषध मिसळून दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना ईश्वरपूर परिसरात घडली आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी एका संशयिताला तात्काळ ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत, तर दुसरा संशयित पसार झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणी मूळची सातारा जिल्ह्यातील असून ती ईश्वरपूर येथील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. संशयित आरोपींनी तिच्याशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेतला. तिला विश्वासात घेऊन कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेण्यात आले. त्या ठिकाणी तरुणीला विश्वासात घेत शीतपेयातून गुंगीचे औषध अथवा अमली पदार्थ पाजण्यात आले.
गुंगीच्या प्रभावामुळे तरुणीची शुद्ध हरपल्यानंतर दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता, घडलेला हा प्रकार कोणापुढे उघड केल्यास किंवा पोलिसांकडे गेल्यास जिवे मारण्याची गंभीर धमकी संशयितांनी तरुणीला दिली.
या धक्कादायक प्रकारानंतर पीडित विद्यार्थिनीने हिंमत दाखवत थेट ईश्वरपूर पोलीस ठाणे गाठून घडलेली हकीकत कथन केली व फिर्याद दिली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत गुन्हा दाखल केला आणि शार्दुल विद्यापती पाटील (वय २१, रा. रेठरे धरण, ता. वाळवा) याला बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यातील त्याचा साथीदार प्रथम सचिन पाटील (रा. ईश्वरपूर) हा फरार झाला असून पोलीस पथके त्याचा माग काढत आहेत.
पोलिसांनी संबंधित लॉज परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून साक्षीदारांची चौकशी केली जात आहे. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि अशा घटनांना खतपाणी घालणाऱ्या लॉज व्यवस्थापनाची काय भूमिका आहे, या दिशेनेही तपास सुरू आहे. उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अशा प्रकारे भरदिवसा अत्याचार झाल्याने शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ईश्वरपूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.




