डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती राष्ट्रीय कथा स्पर्धेचा निकाल जाहीर
प्रा. धनाजी बुटेरे आणि संध्या धर्माधिकारी यांच्या कथांना विभागून प्रथम पारितोषिक

डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती राष्ट्रीय कथा स्पर्धेचा निकाल जाहीर
प्रा. धनाजी बुटेरे आणि संध्या धर्माधिकारी यांच्या कथांना विभागून प्रथम पारितोषिक
शिरोळ :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
स्वर्गीय आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित अकराव्या अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेत ठाणे येथील प्रा. धनाजी जनार्दन बुटेरे यांच्या ‘दावण’ आणि सोलापूरच्या सौ. संध्या धर्माधिकारी यांच्या ‘डंक’ या कथेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्री दत्त उद्योग समूहाचे मार्गदर्शक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या प्रेरणेतून दरवर्षी ही स्पर्धा साहित्य वर्तुळात प्रतिष्ठेची मानली जाते. यंदा स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश या राज्यांसह परदेशातूनही तब्बल १५८ कथा दाखल झाल्या होत्या. त्यातून निवडक १५ कथांना विविध पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती ‘साहित्य सहयोग’ दीपावली अंकाचे संपादक सुनील इनामदार आणि मासिक ‘इंद्रधनुष्य’चे कार्यकारी संपादक संजय सुतार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
स्पर्धेतील द्वितीय क्रमांक हेरले येथील सौ. नीता माळी यांच्या ‘एकटेपणाचा वारसा’ आणि नागठाणे (सांगली) येथील रमजान मुल्ला यांच्या ‘बंदा रुपयाची गोष्ट’ या कथांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांकासाठी नौपाडा (ठाणे) येथील सौ. अतुला मेहंदळे लिखित ‘नात्यांची श्रीमंती’ आणि उत्तूर (जि. कोल्हापूर) येथील अभिजीत देसाई यांच्या ‘आणि कडूकर आजी गोड हसल्या’ या कथांची निवड झाली आहे. कथानिर्मितीतील वेगळेपण जपणाऱ्या तीन कथांना विशेष उल्लेखनीय पारितोषिक देण्यात आले. यामध्ये नृसिंहवाडी येथील गुरुप्रसाद दत्तात्रय रिसबूड यांची ‘शिक्षणाची ऐशी तैशी’, सांगलीच्या डॉ. सोनिया कस्तुरे यांची ‘पालवी’ आणि रुकडी (जि. कोल्हापूर) येथील संजय वसंतराव वारके यांच्या ‘कारभारी’ या कथेचा समावेश आहे. उत्तेजनार्थ विभागात हैदराबादच्या सौ. स्वाती बालुरकर-देशपांडे यांची ‘पडदा’, शिरोळ येथील ऋषिकेश विटेकरी यांची ‘गंदी नाली का किडा’ आणि इंदूर (मध्य प्रदेश) येथील सौ. हर्षदा अशोक वाघ यांच्या ‘ढ’ या कथेला गौरवण्यात आले आहे. स्थानिक लेखकांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ देणाऱ्या उत्तेजनार्थ स्थानिक गटात मडीलगे (भुदरगड) येथील निवृत्ती बामणे यांच्या ‘म्हणे आम्ही स्वतंत्र झालो’, कोल्हापूरचे विजयसिंह शिंदे यांच्या ‘जप्ती’ आणि कोल्हापुरातील जवाहर नगर येथील सौ. सुनंदा राजेंद्र कांबळे यांच्या ‘सार्थ विश्वास’ या कथांची निवड झाली आहे.
स्पर्धेत पारितोषिकप्राप्त सर्व कथांना ‘साहित्य सहयोग’च्या यंदाच्या दीपावली विशेषांकात विशेष प्रसिद्धी दिली जाणार आहे. तसेच या स्पर्धेचा मुख्य बक्षीस वितरण सोहळा स्वर्गीय आमदार डॉ. आप्पासाहेब पाटील यांच्या जयंतीदिनी म्हणजेच ११ डिसेंबर २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले.



