ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचे पुण्यात निधन ; सायंकाळी येरवडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचे पुण्यात निधन ; सायंकाळी येरवडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
पुणे :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
मराठी रंगभूमी, लोककला आणि चित्रपटसृष्टीवर आपल्या कसदार अभिनयाने तसेच अस्सल लावणीने चार दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे सोमवारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या प्रदीर्घ आजारपणाशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आणि चित्रपटसृष्टीचा एक तेजस्वी अध्याय संपल्याची भावना व्यक्त होत असून संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता पुण्याच्या येरवडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे २८ जुलै १९५३ रोजी जन्मलेल्या मधू कांबीकर यांना लोककलेचा वारसा कुटुंबातूनच लाभला होता. कोल्हाटी समाजात जन्म घेतलेल्या कांबीकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अगदी लहान वयातच तमाशाच्या फडात पाऊल ठेवले. आपल्या अजोड नृत्यकौशल्याने आणि जिद्दीने त्यांनी लावणी तसेच लोकनाट्याला केवळ जिवंत ठेवले नाही, तर या लोककला प्रकारांना पांढरपेशा समाजात आणि मोठ्या मंचांवर मानाचे स्थान मिळवून दिले.
दादू इंदुरीकर यांच्या ‘गाढवाचं लग्न’ आणि शंकर पाटील यांच्या ‘भानगडीशिवाय पुढारी नाही’ यांसारख्या गाजलेल्या लोकनाट्यांतून त्यांच्या अभिनयाची खरी चुणूक रसिकांसमोर आली. त्यानंतर शाहू मोडक यांच्या प्रेरणेने त्यांनी सुरू केलेल्या ‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली. या कार्यक्रमाचे प्रयोग केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर अमेरिका, दुबई, अबुधाबी आणि मॉरिशस यांसारख्या परदेशांतही मोठ्या उत्साहात झाले. शाहिर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या पथकातूनही त्यांनी दिल्लीसह देशभरात आपल्या लोककलेचा ठसा उमटवला होता. लावणीतील नजाकत, डोळ्यांतील बोलके भाव आणि ठसकेबाज नृत्याविष्कार यामुळे त्या घराघरांत पोहोचल्या. अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी लावणीचे शास्त्रोक्त प्रशिक्षणही दिले.
लोककलेच्या मंचावरून सुरू झालेला त्यांचा हा कलाप्रवास पुढे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही तितकाच दिमाखदार ठरला. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांत विविध ढंगांच्या भूमिका साकारल्या. ‘शापित’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘हेच माझं माहेर’, ‘ह्योच नवरा पाह्यजे’, ‘सतीची पुण्याई’, ‘आज झाले मुक्त मी’ आणि ‘रावसाहेब’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ग्रामीण ढंगातील सोज्वळ नायिका असो, तमाशा कलावंत असो वा गंभीर कौटुंबिक व्यक्तिरेखा, प्रत्येक पात्रात त्या सहजतेने रंग भरत असत. त्यांच्या या चौफेर योगदानाची दखल घेत राज्य शासनासह अनेक नामांकित संस्थांनी त्यांना जीवनगौरव आणि विविध पुरस्कारांनी सन्मानित केले होते.
नोव्हेंबर २०१६ मध्ये यशवंत नाट्यमंदिरात एका कार्यक्रमादरम्यान लावणी सादर करत असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना अर्धांगवायूचा (पक्षाघात) झटका आला. त्यानंतर त्या सार्वजनिक मंचांपासून आणि अभिनय क्षेत्रापासून दूर होत्या. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते आणि त्या प्रदीर्घ काळ अंथरुणाला खिळून होत्या. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने अस्सल ग्रामीण लोककला आणि चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.




