खाजगी शिकवणी नियमन कायदा छोट्या क्लास चालकांसाठी अन्यायकारक; रस्त्यावर उतरण्याचा कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशनचा इशारा
जाचक अटींविरोधात ४ सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याचे आवाहन

खाजगी शिकवणी नियमन कायदा छोट्या क्लास चालकांसाठी अन्यायकारक ; रस्त्यावर उतरण्याचा कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशनचा इशारा
जाचक अटींविरोधात ४ सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याचे आवाहन
मिरज : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला ‘खाजगी शिकवणी नियमन कायदा २०२६’ चा मसुदा अत्यंत जाचक असून तो छोट्या क्लास चालकांसाठी अन्यायकारक आहे. हा कायदा जशाच्या तसा लागू झाल्यास हजारो छोट्या शिक्षकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल. त्यामुळे या अन्यायाविरोधात सर्व क्लास चालकांनी संघटित होऊन लढा द्यावा, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून हक्क मागावेत, असा आक्रमक इशारा कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशनचे राज्य ज्येष्ठ सल्लागार संजय कुलकर्णी यांनी दिला. कोचिंग क्लासेस टीचर्स असोसिएशन व सोशल फोरम सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे आयोजित सांगली जिल्हा क्लास चालकांच्या मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
मेळाव्यात राज्य समन्वयक प्रताप गस्ते यांनी प्रस्तावित मसुद्यातील विविध त्रुटी व विसंगतींवर सविस्तर प्रकाश टाकला. शासनाने कॉर्पोरेट क्लासेस आणि एका खोलीत एकच विषय शिकवणारे शिक्षक यांना एकाच तराजूत तोलले असल्याचे सांगत, एका शिक्षकी वर्गासाठी, छोट्या अकॅडमीसाठी आणि मोठ्या बहुशाखीय कॉर्पोरेट संस्थांसाठी स्वतंत्र नियमावली असणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली. आजच्या धावपळीच्या काळात अनेक कुटुंबांत आई-वडील दोघेही नोकरीनिमित्त बाहेर असतात, अशा वेळी शाळेव्यतिरिक्त वेळेत क्लास चालक मुलांच्या अभ्यासासोबत संस्कारांचीही जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे १३ वर्षांखालील मुलांच्या शिकवणीवर बंदी घालणे अवास्तव असल्याचे ते म्हणाले.
तसेच महिन्याला अवघे पाच ते पंचवीस हजार रुपये मिळवणाऱ्या सामान्य शिक्षकाकडून नियमात किरकोळ त्रुटी राहिल्यास थेट ५० लाखांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद मारक आहे. जागेच्या टंचाईच्या काळात प्रति विद्यार्थी एक चौरस मीटर जागेची सक्ती करणे अशक्यप्राय आहे. याशिवाय केवळ गुन्हा दाखल झाल्याच्या कारणावरून शिकवण्यास बंदी घालणे अयोग्य असून, गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झाल्यासच निर्बंध घालावेत अशी भूमिका त्यांनी मांडली. चौकशी अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार नाकारणे हे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव धुळूबुळू यांनी वस्तुस्थिती सरकारसमोर मांडण्यासाठी छोट्या-मोठ्या सर्व शिकवणी चालकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. शासनाने मागवलेल्या हरकती व सूचनांच्या पार्श्वभूमीवर सर्व चालकांनी येत्या ४ सप्टेंबरपर्यंत अधिकृतपणे हरकती नोंदवाव्यात, असा ठराव यावेळी करण्यात आला. सागर पाटील यांनी सर्व क्लास चालक या लढ्यात पूर्ण ताकदीने संघटनेसोबत राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हाध्यक्ष बसवराज हिरेमठ यांनी स्वागत व प्रास्ताविक करून मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली, तर मकरंद उपळाविकर यांनी आभार मानले. या मेळाव्यास राज्य संघटनेचे पदाधिकारी गणेश जोशी, सूर्यकांत तवटे, जिल्हा ज्येष्ठ मार्गदर्शक रावसाहेब हल्लोळे, कार्यवाह राजू पाटील, वाळवा तालुकाध्यक्ष समाधान गरड, मनोज जाधव, गणेश निकम, जत तालुका प्रतिनिधी अनिल पुरोहित, स्वाती मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील क्लास चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




