कृषी व व्यापारमहाराष्ट्र

शेतकरी कर्जमुक्तीचा दुसरा टप्पा जारी; ६.३६ लाख शेतकऱ्यांना ५,०८६ कोटींचा दिलासा

आतापर्यंत १२.५८ लाख शेतकऱ्यांना १०,११५ कोटींची कर्जमुक्ती  

शेतकरी कर्जमुक्तीचा दुसरा टप्पा जारी ; ६.३६ लाख शेतकऱ्यांना ५०८६ कोटींचा दिलासा.

आतापर्यंत १२.५८ लाख शेतकऱ्यांना १०,११५ कोटींची कर्जमुक्ती  

​मुंबई :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

नैसर्गिक संकटे आणि आर्थिक अडचणींमुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातील बळिराजाला मोठा दिलासा देत राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत कर्जमुक्तीचा दुसरा हप्ता जारी केला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ५ हजार ८६ कोटी रुपयांची रक्कम थेट ऑनलाईन पद्धतीने वर्ग करण्यात आली.  

​शासनाने यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटी रुपयांचा लाभ दिला होता. आजच्या दुसऱ्या टप्प्यातील वितरणासह आतापर्यंत राज्यातील एकूण १२ लाख ५८ हजार २४३ शेतकऱ्यांना तब्बल १० हजार ११५ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

​या योजनेची अंमलबजावणी अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने सुरू असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री म्हणाले की, आतापर्यंत राज्यातील सुमारे १३ लाख ७० हजार कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. पात्र लाभार्थ्यांची निश्चिती आणि निधी वितरणाची ही अखंडित प्रक्रिया असून लाभार्थींची यादी सातत्याने अद्ययावत केली जात आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही टप्प्याटप्प्याने कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार असून कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

​दुसऱ्या टप्प्यातील विभागनिहाय आकडेवारीचा विचार करता छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक म्हणजेच ३ लाख २ हजार २७३ शेतकऱ्यांना २ हजार २८४ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. त्याखालोखाल अमरावती विभागातील १ लाख ४५ हजार ८०८ शेतकऱ्यांना १ हजार २०८ कोटी, नाशिक विभागातील ८४ हजार ८१३ शेतकऱ्यांना ७५६ कोटी, पुणे विभागातील ४९ हजार २२४ शेतकऱ्यांना ४१७ कोटी, नागपूर विभागातील ४४ हजार ८६४ शेतकऱ्यांना ३६६ कोटी तसेच कोकण विभागातील ९ हजार ५४ शेतकऱ्यांना ५४ कोटी रुपयांचे कर्जमाफीचे लाभ वितरित झाले आहेत.

​थेट लाभ हस्तांतरण प्रणालीच्या माध्यमातून कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा होत असल्याने या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखली जात आहे. या कर्जमुक्तीमुळे शेतकरी पुन्हा एकदा अधिकृत पीककर्जासाठी पात्र ठरणार असून आगामी शेतीकामांसाठी त्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.  

​या ऑनलाईन वितरण सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??