चंद्रशेखर खोत यांना पुण्यात शिक्षक कृतज्ञता पुरस्कार प्रदान संजीवनच्या शिरपेचात मानाचा तुरा

चंद्रशेखर खोत यांना पुण्यात शिक्षक कृतज्ञता पुरस्कार प्रदान संजीवनच्या शिरपेचात मानाचा तुरा
पन्हाळा : प्रसाद जाधव / एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
संगीताच्या माध्यमातून भावी पिढीवर संस्कार करत विद्यार्थ्यांमध्ये कलागुण रुजवणारे संजीवन विद्यालयाचे संगीत शिक्षक आणि ज्येष्ठ गिटार वादक चंद्रशेखर देवदास खोत यांना यंदाच्या मानाच्या ‘टीचर्स अप्रीसिएशन अवॉर्ड २०२६’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशन, आर्ट्स अँड स्पोर्ट्स (एनसीईएएस) आणि इनार्क ट्रेनिंग मॅनेजमेंट ई-लर्निंग यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सभागृहात हा शानदार पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
शिक्षण, कला आणि क्रीडा क्षेत्रातील शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, कलावंत आणि मान्यवर उपस्थित होते. संगीत शिक्षणातील दीर्घकालीन अनुभव, विद्यार्थ्यांमधील कलागुणांना दिलेली दिशा आणि गिटार वादनासोबत, की बोर्ड, गीत गायन अशा विविध संगीत कलांवरील प्रभुत्व या निकषांवर खोत यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. एनसीईएएसचे संस्थापक व संचालक डॉ. सुमित दास यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन खोत यांचा गौरव करण्यात आला. व्हिजन एज्युकेशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे या सोहळ्याचे प्रायोजक होते.
संगीताच्या पवित्र कार्याप्रती असलेले समर्पण, आवड आणि अढळ बांधिलकी यातून खोत यांनी असंख्य विद्यार्थ्यांना घडवले असून त्यांच्यातील तालासुरांची जाण समृद्ध केली आहे, अशा शब्दांत मानपत्रात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
पन्हाळा येथील संजीवन विद्यालयात अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे खोत यांनी केवळ शालेय स्तरावरच नव्हे, तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध सांगीतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचे पथक यशस्वीरीत्या घडवले आहे. पाश्चात्त्य आणि भारतीय संगीताचा सुरेख संगम साधत त्यांनी विद्यार्थ्यांना गिटार वादनाचे दर्जेदार धडे दिले आहेत.
खोत यांना मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल संजीवन विद्याविहार संकुलाचे चेअरमन डॉ. पी. आर. भोसले,सहसचिव प्रा. एन आर.भोसले, विद्यालयाचे प्राचार्य महेश पाटील, शिक्षक सहकारी, कोल्हापूर जिल्ह्यातील संगीत व कला क्षेत्रातील मान्यवर तसेच माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




