शांतारामबापू यांचे विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली : सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी

शांतारामबापू यांचे विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली : सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी
इचलकरंजी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांनी महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात, विचारविश्वात तब्बल सात दशके कार्य केले. कमालीची साधी राहणी, वक्तशीरपणा ,विचारातील स्पष्टता आणि बोलण्यातील मार्मिकता इत्यादी अंगभूत वैशिष्ट्यांसह ते अखेरपर्यंत कार्यरत होते. प्रबोधकांचे प्रबोधक असलेले शांतारामबापू यांचे विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते कालवश आचार्य शांताराम गरुड यांच्या पंधराव्या स्मृतिदिनी बोलत होते. प्रारंभी अजित मिणेकर व प्रा. रमेश लवटे यांच्या हस्ते आचार्य गरुड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शशांक बावचकर, अन्वर पटेल,पांडुरंग पिसे, संजय भस्मे, महेंद्र जाधव,सौदामिनी कुलकर्णी, मानसी तगारे, महेश केस्तीकर,भीमराव नायकवडी, प्रीतम कांबळे, धनंजय पाटील, सोफिया मिणेकर, शहाजी जाधव, उमेश यादव, संदीप चव्हाण आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
- प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, हे वर्ष शांताराम बापूंचे जन्मशताब्दी आणि समाजवादी प्रबोधिनीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान हा प्रबोधनाचा अग्रक्रमाचा विषय म्हणून ४९ वर्षांपूर्वी सर्वप्रथम शांतारामबापूंनी पुरोगामी चळवळीच्या केंद्रस्थानी आणला. त्याचबरोबर भारतीय संस्कृती, भारतीय दर्शन परंपरा, समाजवाद,गांधीवाद ,मार्क्सवाद ,आंबेडकरवाद यासह समकालीन आर्थिक,सामाजिक ,सांस्कृतिक, राजकीय घडामोडींचे सैद्धांतिक विश्लेषण करून त्याचे प्रबोधन संस्थात्मक दृष्टीने करण्याचा त्यांचा प्रयत्न हा वाखाणण्याजोगा होता. त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी समाजवादी प्रबोधिनी ही संस्था सर्वार्थाने अधिकाधिक विकसित करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. त्यासाठी लोकप्रबोधनाच्या कामाशी बांधिलकी असलेल्या प्रत्येकाने समाजवादी प्रबोधिनीला जास्तीत जास्त स्वरूपाचे सर्वांगीण सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.




