आपला जिल्हाताज्या घडामोडी

पन्हाळ्यात लता मंगेशकर बंगल्याच्या कठड्यावर राजेशाही थाटात विसावला बिबट्या

बिबट्याच्या दर्शनाचे कुतूहल, तरी सुरक्षिततेची चिंता देखील वाढली

पन्हाळ्यात लता मंगेशकर बंगल्याच्या कठड्यावर राजेशाही थाटात विसावला बिबट्या

पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क (विशेष प्रतिनिधी )

पन्हाळ्याच्या निसर्गरम्य परिसरात पुन्हा एकदा ‘साहेबां’चे दर्शन घडले आहे. पावनगड रस्त्यालगत पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या लता मंगेशकर बंगल्याच्या कठड्यावर एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या अगदी निवांतपणे बसलेला दिसून आला. श्रावणातील हिरवाईने नटलेल्या निसर्गाच्या सान्निध्यात हा वन्य पाहुणा राजेशाही थाटात विसावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बिबट्याचे हे दर्शन होताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले, तरी इतक्या जवळून बिबट्याचे दर्शन घडल्याने त्याचे छायाचित्र टिपण्याचे कुतूहलही वाढले. पाहता पाहता बिबट्याचा फोटो सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सॲप स्टेटसवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

 

पन्हाळ्याच्या साहेबांनी पुन्हा दर्शन दिले’, अशा आशयाचे संदेश त्यानंतर सोशल मीडियावर फिरू लागले. गेल्या काही वर्षांपासून ठराविक कालावधीनंतर पन्हाळा आणि परिसरात बिबट्याचे दर्शन घडत असल्याने या वन्य पाहुण्याने पन्हाळ्यालाच आपले कायमस्वरूपी निवासस्थान बनवले आहे की काय, अशी मिश्कील चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

ऐतिहासिक वारसा, पर्यटन आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पन्हाळ्याच्या ओळखीत आता बिबट्याच्या उपस्थितीचीही भर पडली आहे. लता मंगेशकर बंगला, रेडेघाट आणि पावनगड परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने हा भाग बिबट्यांसाठी सुरक्षित अधिवास ठरत असल्याचे दिसून येते. याच परिसरात बिबट्यांचा नियमित वावर असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.

स्थानिकांच्या माहितीनुसार, या भागात दोन ते चार बिबट्यांची पिल्ले तसेच दोन ते तीन पूर्ण वाढ झालेले बिबटे वावरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये बिबट्याच्या दर्शनाचे कुतूहल असले, तरी त्याचवेळी सुरक्षिततेची चिंता देखील वाढली आहे.

बिबट्याचे दर्शन घडावे या उत्सुकतेपोटी नागरिक आणि पर्यटक या परिसरात फिरताना दिसतात. मात्र, वन्यप्राण्यांच्या हालचाली लक्षात घेता कोणत्याही प्रकारची बेफिकिरी धोकादायक ठरू शकते. नागरिकांनी बिबट्यापासून सुरक्षित अंतर राखावे, त्याचा पाठलाग किंवा छेडछाड करू नये आणि वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

लता मंगेशकर बंगल्याच्या कठड्यावर अगदी निवांतपणे बसलेल्या या बिबट्याच्या छायाचित्राने पन्हाळ्याच्या निसर्गसौंदर्यासोबतच येथील समृद्ध वन्यजीवन पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??