संजीवनमध्ये रंगणार ‘सीबीएसई क्लस्टर ९ फुटबॉल स्पर्धेचा थरार.

संजीवनमध्ये रंगणार ‘सीबीएसई क्लस्टर ९ फुटबॉल स्पर्धेचा थरार.
देशभरातून दोन हजारांहून अधिक खेळाडू दाखल होणार
पन्हाळा :प्रसाद जाधव एन.वाय.नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
येथील नामांकित निवासी शिक्षण संस्था असलेल्या संजीवन पब्लिक स्कूलमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) क्लस्टर ९ अंतर्गत १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचा महासंग्राम रंगणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक आदी परराज्यांतून तब्बल ८० ते ९० संघ दाखल होत असून, सुमारे दोन हजारांवर क्रीडापटू, संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षकांची मांदियाळी संजीवन संकुलात जमणार आहे. या भव्य क्रीडा सोहळ्याच्या आयोजनाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण परिसर क्रीडामय वातावरणाने भारावून गेला आहे, अशी माहिती संस्थेचे सहसचिव प्रा. एन. आर. भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेत १७४१ नामवंत बाल व युवा फुटबॉलपटू आपापल्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या समवेत १४३ संघ व्यवस्थापक व तंत्रकुशल प्रशिक्षक उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेतील सामन्यांचा व्याप लक्षात घेता, संजीवनच्या मुख्य क्रीडांगणासह वारणा-कोडोली येथील दोन मैदाने आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या मैदानावर एकाच वेळी हे सामने खेळवले जाणार आहेत. चुरशीच्या सामन्यांसाठी सर्व मैदानांची पाहणी करून ती सज्ज ठेवण्यात आली आहेत.
बाहेरगावाहून येणाऱ्या हजारो खेळाडूंची गैरसोय होऊ नये म्हणून संजीवन प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. खेळाडूंच्या आगमनापासून ते सुरक्षित परतीपर्यंत सर्व यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानक तसेच प्रमुख बस स्थानकांवर खेळाडूंचे स्वागत करून त्यांना वाहनांद्वारे संजीवन संकुलात आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सह्याद्री, शिवनेरी, द्रोणागिरी आणि देवगिरी या वसतिगृहांसह प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतींमध्ये खेळाडूंच्या निवासाची व पौष्टिक भोजनाची दर्जेदार सोय करण्यात आली आहे.
स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक संघासाठी स्वतंत्र टीम समन्वयक, डॉर्म व इमारत समन्वयक, वाहतूक प्रमुख आणि संजीवनचे विद्यार्थी स्वयंसेवक नियुक्त केले आहेत. मैदानावर तसेच निवासाच्या ठिकाणी चोवीस तास वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आणि प्रथमोपचाराची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खेळाडूंमधील क्रीडाभावनेला प्रोत्साहन देतानाच कडक शिस्त, सुरक्षितता, वेळेचे तंतोतंत पालन आणि संजीवनच्या परंपरेला साजेसे आदरातिथ्य यावर विशेष भर देण्यात आला आहे.
खेळाच्या माध्यमातून युवा पिढीमध्ये नेतृत्वगुण, संघभावना, प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची चिकाटी आणि आत्मशिस्त निर्माण व्हावी हा या भव्य आयोजनामागील मूळ उद्देश आहे. फुटबॉल स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या फुटबॉल महासंग्रामानंतर लगेचच आगामी ७ सप्टेंबरपासून याच प्रांगणात भव्य हॉकी स्पर्धेचा थरारही रंगणार असल्याचे भोसले यांनी शेवटी नमूद केले. सदर पत्रकार परिषदेसाठी संस्थापक चेअरमन डॉ.पी.आर.भोसले क्रीडा संचालक सौरभ भोसले व प्रशालेचे प्राचार्य बी. आर. बेलेकर यांनी शुभेच्छा दिल्या.




