
विशेष लेख :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
आजही श्लोक पठणाची गरज आहे
विज्ञानयुगात विवेकाने अध्यात्माशी नाते जोडण्याची गरज….
मंडळी, फार पूर्वीपासून आपल्या परिवारात सर्व कुटुंबातील सदस्यांना विविध प्रसंगी आजी-आजोबांचा मुलांना श्लोक म्हणण्याचा आग्रह असायचा. कुटुंबात संस्कृत आणि प्राकृतमधील हे श्लोक मुलांकडून आजी-आजोबा म्हणवून घ्यायचे. मोठ्या आवाजात सतत घोकंपट्टी करून हे श्लोक पाठ करून घेतले जायचे. अशावेळी श्लोक म्हणणाऱ्या मुलांचे नातेवाईक मंडळींमध्ये कौतुक व्हायचे.
हे घराघरात संस्कृत अथवा प्राकृत ‘श्लोक’ म्हणण्यामागे अनेक हेतू असायचे. आपल्या संस्कृतीचे जतन व्हावेच आणि त्यातून पुढच्या पिढीला श्लोकांचे अर्थ समजून देताना त्यांचे भावजीवन समृद्ध व्हावे, हा मागील पिढीचा उद्देश होता.
पहाटेच्या ‘कराग्रे वसते लक्ष्मी’पासून ‘रामरक्षा’, ‘शुभं करोती’, ‘वदनी कवळ घेता’ असे अनेक श्लोक घराघरात म्हटले जायचे. या श्लोकांनी आणि मंत्रांनी मागील अनेक पिढ्या समृद्ध होत होत्या. भक्कम संस्कारांच्या पायावर भावी पिढी विवेकशील बनत होती.
सकाळी लवकर उठावे, सूर्यनमस्कार मंत्रांच्या उच्चारांसह करावेत, ‘समुद्रवसने देवी’ अशा श्लोकांमधून आपल्या भूमीचा आदर करून भूमीवंदना करावी, असे संस्कार रुजवले जात होते. ‘वदनी कवळ घेता’सारखे श्लोक म्हणताना अन्न वाया घालवू नये, भोजन करणे म्हणजे केवळ अन्न भक्षण करणे नसून ‘भोजन’ हे यज्ञकर्म आहे, ही जाणीव करून दिली जात होती. ईश्वराला समर्पित आपली सर्व कर्मे अर्पण करणे, ही भावना श्लोकांमधून व्यक्त होत होती.
आजकाल आम्हाला विज्ञानयुगात हे संस्कार थोतांड वाटत आहे का? ‘रेन रेन गो अवे’च्या संस्कारांत आग्रहाने श्लोकसंस्कार पुढच्या पिढीला शिकवणारे आजी-आजोबा अडगळीत आहेत. आपले आजी-आजोबा अडाणी आहेत, हे काही घरांत मुलांच्या मनावर ठसवले जात आहे.
आजकाल सतत मोबाईल हातात असणाऱ्या पालकांना श्लोक येत नाहीत आणि शिकायची इच्छाही नाही, असे चित्र आहे. हॉटेल आणि ढाबा संस्कृतीमध्ये ‘वदनी कवळ घेता’ हे संस्कार आज ‘outdated’ वाटत आहेत. ‘शुभं करोती’ केव्हाच संध्याकाळच्या मालिकांमध्ये नामशेष झाली आहे. दारात ‘मनी प्लांट’ आले आणि तुळशीवृंदावन गायब झाले. त्यामुळे ‘दिव्य दिव्य दीपत्कार’च्या अर्थासाठी पालकांना गुगलला हात जोडावे लागत आहेत.
सूर्योदय अनेक घरांतील अनेकांनी कित्येक वर्षे पाहिलाच नाही, हे वास्तव आहे. प्रातःकालची ध्यान-धारणा, योगाभ्यास आजकाल पुरोगामी विचारांत अंधश्रद्धा वाटत आहे. वीकेंड कल्चरमुळे सकाळी उठण्यासाठी मोबाईलचा ‘अलार्म’ माणसांचा सोबती झाला आहे.
आम्ही विज्ञानवादी, पुरोगामी वगैरे होत चाललो आहोत; पण पुरातन काळापासून आपले भारतीय अध्यात्म आणि संस्कार हे विज्ञानाचा पुरस्कार करणारेच होते, ही जाणीवपूर्वक विसरली जाणारी बाब आहे.
आजकाल विज्ञानवादी म्हणजे नास्तिक असणे, असा अर्थ रूढ केला जात आहे. धर्म, कल्पना, श्लोक, मंत्र या विज्ञानाला अमान्य आहेत, असे नव्या पिढीवर बिंबवले जात असते. पण खरी गोष्ट अशी की, आपल्या साधू-संतांचे, ऋषी-मुनींचे विचार मानवी जीवन सर्वार्थाने कल्याणकारी व्हावे, हा प्रामुख्याने उद्देश होता.
परिवारात दररोज होणाऱ्या श्लोकांच्या संस्कारांमुळे मनाची आणि आपल्या उच्चारांची शुद्धता होत होती. मुलांना संस्कृत व्याकरण नीट समजत होते. हे मंत्र किंवा श्लोक संतांच्या तपश्चर्येतून प्रकट झालेले होते, त्यामुळे त्यांच्या उच्चारणामुळे साहजिकच घरातील ताणतणावाला कारणीभूत असलेल्या नकारात्मक ऊर्जा कमी होऊन प्रत्येक परिवारात आत्मिक समाधान साधले जायचे, अशी श्रद्धा होती. मुलांची बुद्धी तेज होऊन आकलन क्षमता वाढत होती. मागच्या पिढीचे पाठांतर अफलातून होते; आता ते दृश्य दिसत नाही.
उदाहरणादाखल समर्थांच्या ‘नृसिंहपंचक’मधील हे श्लोक पाहूया. ज्यांचे उच्चार अशुद्ध आहेत, जन्मजात तोतरेपणा आहे किंवा सभेत अथवा समाजात बोलताना आत्मविश्वास कमी आहे, अशा मंडळींनी अथवा मुलांनी हे श्लोक नियमित मोठ्या आवाजात म्हणण्याचा प्रयत्न जरूर करून पाहावा.
पालकांना आपल्या मुलांचे उच्चार नीट यावेत, त्यांचा तोतरेपणा कमी व्हावा अथवा भाषा शुद्ध व्हावी, असे वाटत असेल तर एखादा प्रयोग म्हणून खालील समर्थांच्या श्लोकाचा सराव करायला हरकत नाही. अर्थात, उच्चार किंवा बोलण्याच्या अडचणींसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणेही आवश्यक आहे.
थोडक्यात काय, विज्ञानयुगात वावरताना विवेकाने अध्यात्माशी नाते जोडून विज्ञानाच्या माध्यमातून सर्वांचे जीवन समृद्ध व्हावे, हा साधू-संतांचा दृष्टिकोन होता. हा विचार, हा संस्कार आपण जाणीवपूर्वक आपल्या परिवारात रुजवायला सुरुवात करून सर्वांचे जीवन मंगल करूया.
राम कृष्ण हरी !
भाषालंकार : अनुप्रास
श्रीसमर्थ रामदासकृत नृसिंहपंचक
नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें
प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें
खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें
तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हीजाळें।।
झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी
लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी।
लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी
हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी
कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।।
कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं
घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं
तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं
धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।।
भरभरित भरारी भर्भराटे भरारी
थरथरित थरारी थर्रथराटे थरारी
तरतरित तरारी तर्तराटे तरारी
चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।।
रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी।
गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी।
न धरित जन मानें लोक गेलें निदानें।
हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।।
जय जय रघुवीर समर्थ!
वरील श्लोक किमान तीन महिने दररोज नियमित, आत्यंतिक श्रद्धेने आणि मोठ्या आवाजात आपल्या परिवारात सर्वांनी अथवा मुलांनी म्हटल्यास त्यांच्या तोतरेपणात कमी होण्यास किंवा उच्चारणशुद्धता साधण्यास मदत होऊ शकते, ही आमची मनस्वी श्रद्धा आहे.
— पांडुरंग गांजवे

(लेखक परिचय : पांडुरंग मारुती गांजवे हे संजीवन पब्लिक स्कूल, पन्हाळा येथे मराठी विभागप्रमुख असून कथा, काव्य, बालनाट्य, एकांकिका व लेखनासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत.संतसाहित्यावर हजाराहून अधिक प्रवचने, आकाशवाणी-दूरदर्शनवरील सहभाग तसेच नाट्यलेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन आणि ब्लॉगलेखन अशी त्यांची बहुआयामी साहित्यिक वाटचाल आहे.)
[संपादकीय सूचना : प्रस्तुत लेखातील विचार, मते, दावे आणि भूमिका ही संबंधित लेखकाची वैयक्तिक मते आहेत. त्यातील सर्व विचारांशी संपादक, संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. वाचकांनी या लेखातील दावे व निष्कर्ष यांचा विवेकबुद्धीने विचार करावा.]




