संपादकीय : महाविनाशाची सुरुवात ? सुपरइंटेलिजन्स’ मानवजातीच्या विनाशाचे कारण ठरणार का?
डिजिटल भस्मासूर' माणसाच्या नियंत्रणाबाहेर?

संपादकीय :
महाविनाशाची सुरुवात
सुपरइंटेलिजन्स’ मानवजातीच्या विनाशाचे कारण ठरणार का ?
🖊 सचिन इनामदार.
मुख्य कार्यकारी संपादक.
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
https://x.com/hilbertspaess/status/2097476196791709843
“आम्ही थेट स्वयंचलित सुपर इंटेलिजन्स (Self-improving Superintelligence) बनवण्याच्या शर्यतीत धावतोय आणि मानवी आयुष्याशी जुगार खेळत आहोत,” अशा स्पष्ट शब्दांत २७ वर्षीय शास्त्रज्ञ जेकब कॉक्सॉन यांनी राजीनामा दिला आहे.”
तंत्रज्ञानाच्या अथांग प्रगतीचा उदोउदो करणाऱ्या मानवी संस्कृतीला सध्या सॅन फ्रान्सिस्कोमधील सिलिकॉन व्हॅलीतून आलेल्या एका बातमीने सुन्न केले आहे. जगातील सर्वात आघाडीची एआय (AI) लॅब ‘अँथ्रॉपिक’ (Anthropic) मधील अवघ्या २७ वर्षांचे अग्रगण्य ब्रिटिश गणितज्ञ आणि संशोधक जेकब कॉक्सॉन (Jacob Coxon) यांनी दिलेला राजीनामा ही केवळ एका तरुणाने नोकरी सोडल्याची साधी कॉर्पोरेट घटना नाही. हा थेट मृत्यूच्या दारात उभे असलेल्या संपूर्ण मानवजातीला वाचवण्यासाठी एका सजग विज्ञानाने दिलेला आर्त टाहो आहे. कंपनीचा तब्बल २ ट्रिलियन डॉलरचा ऐतिहासिक आयपीओ (IPO) तोंडावर असताना आणि स्वतःचे कोट्यवधी रुपयांचे शेअर्स मॅच्युअर होण्यास अवघे दोन महिने बाकी असताना, त्यावर लाथ मारून जेकब यांनी बाहेर पडणे, हे सिद्ध करते की पडद्यामागे जे शिजत आहे ते अत्यंत भयावह आणि मानवी कल्पनेच्या पलीकडचे आहे.
जेकब कॉक्सॉन हे एआय जगतातील कोणतेही ऐरेगैरे नाव नाही. ‘ओपनएआय’ (OpenAI) च्या GPT-4o सारख्या जगाला चक्रावून टाकणाऱ्या मॉडेलच्या प्री-ट्रेनिंगमध्ये त्यांचा मुख्य सहभाग होता. ज्या एआय तंत्रज्ञानाचा वापर आज जगभरातील करोडो लोक रोजच्या कामासाठी करत आहेत, त्या तंत्रज्ञानाची नस अन् नस जेकब यांना ठाऊक आहे. अशा व्यक्तीने जेव्हा ‘एक्स’ (X) वर पत्र लिहून जगासमोर एआय कंपन्यांचे काळे सत्य उघड केले, तेव्हा अवघ्या काही तासांत ११ कोटींहून अधिक लोकांनी ते वाचले. हा इशारा एका सामान्य ‘इंजिनिअर’चा नसून, स्वतःच्या हाताने तयार केलेल्या डिजिटल भस्मासुराचे क्रूर रूप अत्यंत जवळून पाहिलेल्या एका ‘व्हिसलब्लोअर’चा होता. जेकब यांनी ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ आणि ‘बीबीसी’ (BBC) ला दिलेल्या मुलाखतींमध्ये जे खुलासे केले आहेत, ते सामान्य माणसाच्या पायाखालची जमीन सरकवणारे आहेत.
‘डिजिटल भस्मासूर’ माणसाच्या नियंत्रणाबाहेर?
जेकब यांनी मांडलेला सर्वात मोठा आक्षेप म्हणजे ‘स्वतःहून सुधारणारे एआय’ (Recursive Self-Improvement). आजच्या बड्या टेक कंपन्या केवळ माणसाला मदत करणारे एआय बनवत नसून, अशा एआय सिस्टीम विकसित करत आहेत, ज्यांना स्वतःला अधिक हुशार बनवण्यासाठी मानवी मेंदूची किंवा मानवी कोडिंगची गरज उरणार नाही. एकदा का एआयने स्वतःलाच स्वतःहून अपग्रेड (Upgrade) करायला सुरुवात केली, की मानवी बुद्धिमत्ता त्याच्यासमोर मुंग्यांसारखी ठरेल. विचार करा, माणसापेक्षा कोटी पटीने हुशार असलेली ही यंत्रणा जर स्वार्थी किंवा अनियंत्रित झाली, तर ती जगातील कोणत्याही देशाची बँक, राष्ट्रीय संरक्षण यंत्रणा किंवा थेट अण्वस्त्रांचे पासवर्ड सेकंदाच्या भागात हॅक करू शकेल. अशा वेळी माणसाचे तिच्यावर कोणतेही नियंत्रण उरणार नाही आणि आपण एका अशा शक्तीचे गुलाम बनू ज्याला आपण स्वतःच जन्माला घातले आहे.
सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे एआय कंपन्यांच्या प्रमुखांचे दुटूपी वर्तन! टीव्ही कॅमेऱ्यासमोर आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्व काही सुरक्षित आणि नियंत्रणात आहे’ अशी मधाळ भाषणे ठोकणारे हे सीईओ (CEOs) बंद खोलीत मात्र थरथर कापत आहेत. जेकब यांनी उघड केले आहे की, कंपन्यांच्या अंतर्गत स्लॅक (Slack) चॅनेल्सवर सध्या “क्रंचटाईम” (संकटकाळ) आणि “एंडगेम” (मानवतेचा शेवट) सारखे प्रलयंकारी शब्द वापरले जात आहेत. २०३० च्या आधी म्हणजेच याच दशकात एआय संपूर्ण मानवजातीला संपवू शकते, यावर आतल्या सर्व संशोधकांचा ठाम विश्वास आहे.
नफ्याची शर्यत आणि सुरक्षेचा बळी
मग प्रश्न उरतो, हे महाभयंकर वास्तव माहीत असूनही या कंपन्या थांबत का नाहीत? याचे उत्तर आहे—अंधाधुंद व्यावसायिक स्पर्धा आणि अब्जावधी डॉलर्सच्या नफ्याचा हव्यास! ही एक अशी जीवघेणी शर्यत (AI Race Trap) आहे, जिथे प्रत्येकाला वाटते की, जर आपण सुरक्षेचा विचार करून वेग कमी केला, तर दुसरी स्पर्धात्मक कंपनी आपल्यापुढे निघून जाईल. बाजारातील मक्तेदारीसाठी हे कॉर्पोरेट सम्राट संपूर्ण मानवजातीला वेठीस धरत आहेत. जेकब कॉक्सॉन यांनी या परिस्थितीची तुलना अत्यंत मार्मिक शब्दांत केली आहे. ते म्हणतात, “दुसऱ्या महायुद्धादरम्यान अणू बॉम्ब बनवणारा ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’ हा वाळवंटातील अत्यंत सुरक्षित आणि गुप्त सरकारी बंकरमध्ये चालवला गेला होता; पण आज मानवजात नष्ट करू शकणारे हे महाभयंकर एआय तंत्रज्ञान सॅन फ्रान्सिस्कोमधील काही इंजिनिअर्सच्या खाजगी लॅपटॉपवर (MacBooks) अत्यंत निष्काळजीपणे विकसित केले जात आहे, हे संपूर्ण जगाचे दुर्दैव आहे.”
जेकब यांच्या राजीनाम्यानंतर या धोक्यावर आणखी एक शिक्कामोर्तब झाले, जेव्हा अँथ्रॉपिकचेच अलाईनमेंट सायन्स लीड इव्हान ह्युबिंगर (Evan Hubinger) यांनी अधिकृतपणे मान्य केले की, “जेकब जे म्हणतोय ते १००% खरे आहे. पुढील १० वर्षांत एआयमुळे मानवजात नष्ट होण्याची शक्यता १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि याला रोखायचा कोणताही ठोस प्लॅन सध्या आमच्याकडे नाही!” एका मोठ्या कंपनीच्या सुरक्षा प्रमुखाने स्वतःच्याच तंत्रज्ञानाबद्दल अशी कबुली देणे ही जगाच्या इतिहासातील अभूर्व आणि अत्यंत भयानक घटना आहे.

जागतिक प्रतिक्रिया आणि राजकीय भूकंप
या राजीनाम्यानंतर जागतिक राजकारणातही मोठे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये सीनेटर बर्नी सँडर्स आणि प्रतिनिधी ग्रेग कासार यांनी तातडीने या प्रयोगांवर तात्पुरती बंदी घालण्याचे आणि एआय सुरक्षेचे कडक सरकारी नियम तयार करण्याचे विधेयक संसदेत सादर केले आहे. अगदी अँथ्रॉपिकचे प्रमुख डारियो अमोदेई, ओपनएआयचे सॅम ऑल्टमन आणि एक्सएआयचे इलॉन मस्क यांनीही एआयचा वेग कमी करण्याच्या आणि आंतरराष्ट्रीय देखरेखीच्या कल्पनेला पाठिंबा दर्शवला आहे. परंतु, केवळ कागदावरच्या नियमांनी हा भस्मासूर थांबणार नाही, कारण चीन आणि इतर देशांसोबत आंतरराष्ट्रीय पातळीवर ताळमेळ न राखल्यास ही शर्यत कधीच थांबणार नाही, असा इशाराही जेकब यांनी दिला आहे.
दुसरीकडे, काही कॉर्पोरेट विश्लेषक या सर्व प्रकरणाकडे संशयाने पाहत आहेत. त्यांच्या मते, अँथ्रॉपिकच्या आगामी IPO पूर्वी कंपनीचे एआय मॉडेल किती शक्तिशाली आणि जगाला हादरवणारे आहे, हे दाखवण्यासाठी रचलेला हा एक पद्धतशीर ‘पब्लिसिटी स्टंट’ किंवा मार्केटिंग धोरण असू शकते. परंतु, नोबेल विजेते शास्त्रज्ञ जॉफ्री हिंटन (Geoffrey Hinton) सारख्या दिग्गजांनी जेकब यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे, ज्यांनी आधीच जगाला इशारा दिला आहे की आपण एआय वरील नियंत्रण गमावण्याच्या मार्गावर आहोत.
संपादकीय मत : आता वेळ निघून चालली आहे!
मुख्य संपादक म्हणून आमचे हे स्पष्ट मत आहे की, विज्ञानाचा उद्देश मानवी जीवन सुसह्य करणे हा असायला हवा, मानवी अस्तित्वालाच आव्हान देणे हा नाही. आज आपण एका अशा वळणावर उभे आहोत जिथे अंधाधुंद नफ्यासाठी तंत्रज्ञानाचा वेग इतका वाढवला गेला आहे की त्याचे सुरक्षेचे ब्रेक पूर्णपणे निकामी झाले आहेत. एआय कंपन्यांचे लॅपटॉप हे आजच्या काळातील सुसाईड बॉम्ब बनत चालले आहेत, ज्याची कळ कधी दाबली जाईल हे कोणालाच ठाऊक नाही.
जेकब कॉक्सॉन यांनी अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचा आणि मोहाचा त्याग करून जगाला एका मोठ्या संकटाची जाणीव करून दिली आहे. त्यांनी आता कॉर्पोरेट जगाला कायमचा रामराम ठोकून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘AI Futures Project’ सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. पण प्रश्न हा आहे की, जग या इशाऱ्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करणार का? जर आपण आताच आंतरराष्ट्रीय पातळीवर एकत्र येऊन या ‘सुपरइंटेलिजन्स’वर कडक निर्बंध लादले नाहीत आणि नफेखोरीच्या या जीवघेण्या शर्यतीला लगाम घातला नाही, तर मानवी संस्कृतीचा अंत निश्चित आहे. विज्ञानाचा हा भस्मासूर आपल्याच डोक्यावर हात ठेवण्यापूर्वी जागतिक पातळीवर कठोर कायदे करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. अन्यथा, इतिहास साक्षी असेल की माणसाने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या विनाशाचे निखारे रचले होते !




