नाशिकमध्ये सिंहस्थाचा महाकुंभ; राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वजारोहण आणि महाआरती संपन्न

नाशिकमध्ये सिंहस्थाचा महाकुंभ; राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वजारोहण आणि महाआरती संपन्न
नाशिक : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
नाशिकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी सिंहस्थ कुंभपर्वाच्या धर्मध्वजारोहण सोहळ्याचा अत्यंत दिमाखदार आणि सोहळा पार पडला. गोदावरी नदीच्या काठावर झालेल्या या भव्य महागोदा आरती आणि धर्मध्वजारोहण कार्यक्रमामुळे संपूर्ण नाशिक नगरीत एक वेगळाच आध्यात्मिक आणि धार्मिक माहोल निर्माण झाला होता. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘पवित्र नाशिक नगरीला माझा नमस्कार’ अशा मराठी शब्दांत करून उपस्थितांची मने जिंकली, ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

या ऐतिहासिक सोहळ्याला राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि देशभरातून आलेले आखाड्यांचे साधू-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोदामाईच्या साक्षीने झालेला हा श्रद्धेचा महासंगम केवळ धार्मिक आयोजन नसून, तो भारतीय संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांचा आणि सामाजिक एकात्मतेचा मोठा संदेश देणारा ठरला आहे. कुंभपर्व हा केवळ आस्थेचा विषय नसून, त्याला पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि आधुनिक कचरा व्यवस्थापनाची जोड देऊन आगामी सिंहस्थ कुंभपर्व एक नवा राष्ट्रीय आदर्श निर्माण करेल, असा विश्वास यावेळी राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सनातन संस्कृतीच्या जतनात आदिवासी जनजातींचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. याच पार्श्वभूमीवर या महागोदा आरती सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्यांमधून आलेल्या साडेसहा हजारहून अधिक जनजाती बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला, जो विविधतेतून एकतेचे उत्तम दर्शन घडवणारा ठरला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या अंदाजे १२ कोटी भाविकांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी राज्य शासन पूर्णपणे सज्ज असून, सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे या परिसरात वेगाने प्रगतीपथावर आहेत. ही सर्व विकासकामे केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित न राहता, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भविष्याला नवी दिशा देणारी ठरतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेल्या विशेष ‘कुंभगीत’ आणि अधिकृत संकेतस्थळाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. तसेच, रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र कुशावर्त तीर्थावर आधारित विशेष टपाल तिकिटांचे विमोचनही यावेळी थाटात पार पडले. या संपूर्ण सोहळ्यामुळे नाशिकच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळाली असून, गोदामाईच्या कृपेने महाराष्ट्रावरील सर्व संकटे दूर होऊन राज्य पुन्हा सुजलाम् सुफलाम् होईल, अशी प्रार्थना यावेळी उपस्थितांनी केली.




