आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कोल्हापूरच्या विकासाला नवी गती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८५० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन

शहराची हद्दवाढ करण्याची ग्वाही.

कोल्हापूरच्या विकासाला नवी गती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८५० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन ; शहराची हद्दवाढ करण्याची ग्वाही.

​कोल्हापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या करवीर नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून शहरात सुमारे १८५० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग, कोल्हापूर महानगरपालिका तसेच महाराष्ट्र पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सर्व प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडले. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर शहराचा वाढता विस्तार विचारात घेता शहराची हद्दवाढ अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. हद्दीबाहेरील नागरिकांच्या सर्व समस्या आणि अडीअडचणी शंभर टक्के सोडवून टप्प्याटप्प्याने हद्दवाढीची प्रक्रिया राबवली जाईल आणि शहराला अधिक सुनियोजित स्वरूप देण्यासाठी राज्य सरकार सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर पार पडलेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

​दोन वर्षांपूर्वी आगीच्या दुर्दैवी दुर्घटनेत नुकसान झालेल्या ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे नाट्यगृह संपूर्ण महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू आहे. १४ ऑगस्ट १९१५ रोजी छत्रपती राजाराम महाराजांच्या हस्ते सुरू झालेल्या या वास्तूचा मूळ ऐतिहासिक आराखडा आणि वारसामूल्य जपून २५ कोटी रुपयांच्या निधीतून त्याचे अत्यंत देखण्या पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले आहे. बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांची ‘संगीत मानापमान’ नाटकातील ऐतिहासिक जुगलबंदी अनुभवणाऱ्या या भूमीला बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, भानू अथय्या आणि पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांसारख्या दिग्गजांचा वारसा लाभला आहे. या नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणामुळे कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक ठेव्याचे पुनरुज्जीवन झाले असून ते पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

​आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने कोल्हापूरसाठी हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरला आहे. ऐतिहासिक छत्रपती प्रमियलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे (सीपीआर) पुनरुज्जीवन करताना तेथे आठ आधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, बर्न वॉर्ड आणि ३० खाटांचा अपघात विभाग सुरू करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार शेंडा पार्क येथे अमेरिकेतील ह्यूस्टन शहराच्या धर्तीवर भव्य मेडिकल हब उभारले जात आहे. यामध्ये ४७३ कोटी रुपयांहून अधिक निधीतून ६०० खाटांचे सामान्य रुग्णालय, २५० खाटांचे कर्करोग रुग्णालय आणि २५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय साकारत आहे. त्यामुळे आगामी काळात कोल्हापूर, कोकण आणि लगतच्या कर्नाटकातील रुग्णांना उपचारासाठी मुंबई किंवा पुण्याला जाण्याची गरज भासणार नाही.

​खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मेजर ध्यानचंद स्टेडियमवर ६ कोटी ९६ लाख रुपये खर्चाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲस्ट्रोटर्फ हॉकी मैदान विकसित करण्यात आले असून क्रिकेट स्टेडियमसाठी बीसीसीआयला विनंती करून आधुनिक स्टेडियम बांधण्याचा प्रयत्न आहे. तसेच कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांसाठी महाराणी ताराराणी गृहसंकुलात २०४ आणि इचलकरंजी येथे २ियो अशा एकूण ४१४ आधुनिक घरांचे लोकार्पण करण्यात आले. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून जागतिक बँकेच्या सहकार्याने ‘महाराष्ट्र रेझिलिएन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ राबवला जात असून, याअंतर्गत पुराचे अतिरिक्त ३५ ते ४० टीएमसी पाणी कॅनॉलद्वारे दुष्काळी भागांत आणि उजनी धरणात वळवले जाणार आहे. सोहळ्यात अंबाबाई मंदिर परिसर विकास, रंकाळा तलावातील संगीतमय कारंजे आणि बहुमजली पार्किंगसह विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. प्रास्ताविक महापौर रूपाराणी निकम यांनी केले, तर आभार महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??