सोशल मीडियावरील गूढ मोहिमेद्वारे कोट्यवधींचा गंडा ; २५ ऑगस्टच्या नावाखाली नेटिझन्सची फसवणूक

सोशल मीडियावरील गूढ मोहिमेद्वारे कोट्यवधींचा गंडा ; २५ ऑगस्टच्या नावाखाली नेटिझन्सची फसवणूक
नवी दिल्ली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
सोशल मीडिया युजर्सच्या औत्सुक्याचा आणि मानसिकतेचा गैरफायदा घेऊन लाखो लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा एक अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवर महिनाभर रहस्यमय वातावरण तयार करून २५ ऑगस्ट रोजी मोठा खुलासा करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात दीड लाखांहून अधिक लोकांकडून पैसे उकळल्यानंतर केवळ एक सर्वसाधारण एआय-निर्मित व्हिडिओ दाखवून युजर्सची दिशाभूल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला इन्स्टाग्रामवर एका अज्ञात मुखवटाधारी व्यक्तीने ‘२५ ऑगस्ट २०२६’ या नावाने खाते सुरू केले होते. या खात्यावरून दररोज गूढ रिल्स आणि स्टोरीज शेअर केल्या जात होत्या. २५ ऑगस्ट रोजी मानवी जीवनाशी किंवा जगाशी संबंधित काहीतरी अत्यंत धक्कादायक आणि मोठे उघड होणार असल्याचा something big is coming… असा दावा सातत्याने केला गेला. या तीव्र सस्पेन्समुळे पाहता पाहता या खात्याचे फॉलोअर्स साडेचार लाखांच्या पुढे गेले. युजर्समध्ये वाढलेली उत्सुकता आणि ‘काहीतरी महत्त्वाचे सुटून जाण्याची भीती’ (FOMO) यांचा पद्धतशीर वापर या मोहिमेत करण्यात आला.
ठरलेल्या वेळेनुसार २५ ऑगस्टच्या मध्यरात्री या खात्यावरून सांगण्यात आले की, इन्स्टाग्रामच्या धोरणांमुळे मोठा व्हिडिओ येथे प्रसिद्ध करता येत नाही, त्यामुळे हा खुलासा टेलिग्रामवर केला जाईल. त्यानुसार सुमारे पावणेदोन लाख युजर्स तातडीने संबंधित टेलिग्राम चॅनेलवर गेले. मात्र, चॅनेलवर पोहोचताच तो व्हिडिओ पाहण्यासाठी युजर्ससमोर २५० ते ५०० रुपयांचे टेलिग्राम स्टार्स भरण्याची अट ठेवण्यात आली. तसेच हा व्हिडिओ काही तासांत काढून टाकला जाईल आणि पुन्हा एका वर्षानंतरच उपलब्ध होईल, असा तातडीचा दबावही निर्माण करण्यात आला.
या अटीला बळी पडून अंदाजे १ लाख ६६ हजार युजर्सनी पैसे भरले. प्राथमिक अंदाजानुसार, या माध्यमातून अज्ञात चालकाने एकाच रात्रीत सुमारे ८ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली. मात्र, पैसे भरून डिजिटल कुलूप उघडल्यानंतर युजर्सच्या पदरी तीव्र निराशा पडली. ज्या बहुचर्चित खुलाश्यासाठी एवढी मोठी रक्कम उकळण्यात आली होती, त्यामध्ये वेळेचे महत्त्व सांगणारा अवघ्या काही मिनिटांचा सामान्य प्रेरणादायी व्हिडिओ दाखवण्यात आला.
व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच या खात्यावरील पूर्वीचे सर्व तपशील बंद करण्यात आले. या प्रकारानंतर देशभरातील सोशल मीडिया युजर्स आणि तंत्रज्ञान अभ्यासकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सायबर तज्ज्ञांच्या मते, ही डिजिटल फसवणूक सोशल इंजिनिअरिंगचे एक प्रगत रूप आहे. कोणत्याही कायदेशीर उत्पादनाशिवाय केवळ लोकांच्या औत्सुक्याला कॅश करून पैसे कमावण्याचा हा सापळा होता. इंटरनेटवर कोणत्याही अज्ञात खात्यावर, अंधधुंद दाव्यांवर आणि संशयास्पद लिंक्सवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करणे किती धोकादायक ठरू शकते, याचा हा गंभीर धडा मानला जात आहे. अशा दिशाभूल करणाऱ्या मोहिमांना बळी न पडण्याचे आवाहन सायबर विश्लेषकांकडून केले जात आहे.




