आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आश्रमशाळांमध्ये २,४२१ शिक्षकांची भरती ; ‘पवित्र ‘ प्रणालीतून होणार प्रक्रिया

आश्रमशाळांमध्ये २,४२१ शिक्षकांची भरती ; ‘पवित्र ‘ प्रणालीतून होणार प्रक्रिया

मुंबई : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील आश्रमशाळांमध्ये वर्ग तीन संवर्गातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) या पदांसाठी एकूण २ हजार ४२१ जागांवर मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेतील शंभर टक्के पदे पवित्र प्रणालीच्या (PAVITRA Portal) माध्यमातून केवळ गुणवत्ता आणि नियमांच्या आधारावर भरली जाणार असल्याने डी.टी.एड. व बी.एड. पदवीधर उमेदवारांना शासकीय सेवेत रुजू होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

 ​दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि आश्रमशाळांमधील अध्यापनातील तूट भरून काढण्यासाठी आदिवासी विकास विभागाने ही पदभरती हाती घेतली आहे. आदिवासी विकास आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या नाशिक, ठाणे, नागपूर आणि अमरावती या चारही अप्पर आयुक्त कार्यक्षेत्रांमधील शासकीय आश्रमशाळांमध्ये ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये नाशिक विभागात सर्वाधिक ८२६ शिक्षकांची पदे भरली जाणार असून त्याखालोखाल ठाणे विभागात ६१३ पदे, नागपूर विभागात ५१४ पदे, तर अमरावती विभागात ४६८ पदांचा समावेश करण्यात आला आहे.

 ​स्थानिक आदिवासी क्षेत्रातील पात्र उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासोबतच सर्व घटकांना समान संधी मिळावी, या उद्देशाने भरती प्रक्रियेत अनुसूचित क्षेत्र (पेसा) आणि बिगर-पेसा क्षेत्राचे सुस्पष्ट विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार संपूर्ण भरतीमध्ये पेसा क्षेत्रासाठी ८८५ पदे, तर बिगर-पेसा क्षेत्रासाठी १ हजार ५३६ पदे निश्चित करण्यात आली आहेत.

 ​प्राथमिक शिक्षक संवर्गामध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांच्या जागांचा समावेश आहे. मराठी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांसाठी बिगर-पेसा क्षेत्रात ८६२ पदे, तर पेसा क्षेत्रात ४३६ पदे भरली जाणार आहेत. इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांसाठी बिगर-पेसा क्षेत्रात १६१ आणि पेसा क्षेत्रात ६७ जागांवर नियुक्ती केली जाईल. माध्यमिक स्तरावर मराठी माध्यमासाठी बिगर-पेसा क्षेत्रात ३५२ आणि पेसा क्षेत्रात १३८ जागा उपलब्ध आहेत, तर इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक शिक्षकांसाठी बिगर-पेसा क्षेत्रात २२ आणि पेसा क्षेत्रात ५ पदांवर प्रक्रिया राबविली जात आहे.

 ​उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालय) स्तरावर शिक्षण सेवकांच्या एकूण ३५७ जागा भरण्यात येत असून यामध्ये पेसा क्षेत्रासाठी २५१ पदे, तर बिगर-पेसा क्षेत्रासाठी १०६ पदे उपलब्ध आहेत. उच्च माध्यमिक स्तरावर मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या सर्व प्रमुख शाखांतील विषयांचा समावेश असल्यामुळे पदव्युत्तर पदवीधर उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 ​भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती देताना आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितले की, ही संपूर्ण भरती प्रक्रिया ‘पवित्र’ पोर्टलद्वारे अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि शासन नियमांनुसारच होत आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी भरतीबाबत पसरवल्या जाणाऱ्या कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या अफवांवर अथवा मध्यस्थांवर अजिबात विश्वास ठेवू नये.

 ​https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??