आमदार नरकेंच्या पाठपुराव्याला यश; पन्हाळा शिवस्मारकासाठी १५ कोटींचा अतिरिक्त निधी
पन्हाळगडाच्या पर्यटन आणि ऐतिहासिक वैभवात मोठी भर

आमदार नरकेंच्या पाठपुराव्याला यश ; पन्हाळा शिवस्मारकासाठी १५ कोटींचा अतिरिक्त निधी
पन्हाळा : (विशेष प्रतिनिधी) एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या पन्हाळगडावरील शिवस्मारक आणि परिसर विकासासाठी राज्य शासनाने आणखी १५ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीला मंजुरी दिली आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या १० कोटींच्या निधीसह आता या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण २५ कोटी रुपयांची भरीव तरतूद झाली आहे. आमदार चंद्रदीप नरके यांनी शासन दरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.
पन्हाळा नगरपरिषद हद्दीतील ऐतिहासिक शिवतीर्थ तलाव परिसरात हे शिवस्मारक साकारले जात आहे. नव्या निधीच्या उपलब्धतेमुळे स्मारक परिसराचे सुशोभीकरण, आकर्षक बगीचा, पर्यटकांसाठी पदपथ, प्रकाशव्यवस्था आणि इतर नागरी सुविधांची कामे आता मार्गी लागणार आहेत. पन्हाळगडाच्या पर्यटन आणि ऐतिहासिक वैभवात या प्रकल्पामुळे मोठी भर पडणार आहे.
पन्हाळगडावर छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक उभारले जावे, ही लाखो शिवप्रेमींची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात या विषयावर सातत्याने आवाज उठवून भरीव निधीची मागणी लावून धरली होती. त्यानुसार २५ मार्च २०२५ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवली होती. त्यानंतर प्रकल्पाचा आवाका आणि उर्वरित कामांची गरज लक्षात घेऊन नगर विकास विभागाने २१ ऑगस्ट २०२६ रोजी उर्वरित १५ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीचा शासन निर्णय जारी केला.
या निर्णयाबाबत बोलताना आमदार चंद्रदीप नरके म्हणाले की, पन्हाळगड हे अवघ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. या गडावरील शिवस्मारक व परिसर विकास म्हणजे केवळ पायाभूत सुविधांची उभारणी नसून, शिवकालीन इतिहासाचा आणि छत्रपतींच्या पराक्रमाचा यथोचित सन्मान आहे. या संपूर्ण विकासकामांचे नियोजन करताना स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि शिवप्रेमींना विश्वासात घेऊनच कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जातील.
शिवस्मारकासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले. तसेच या प्रक्रियेत सहकार्य करणारे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने आणि नगर विकास विभागाचे उपसचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांच्या सहकार्याचाही त्यांनी उल्लेख केला. या निधीमुळे देश-विदेशातून पन्हाळगडावर येणाऱ्या शिवभक्तांना आणि पर्यटकांना दर्जेदार व सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहेत.




