छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयामधे नवागतांचा स्वागत सोहळा उत्साहात संपन्न

छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयामधे नवागतांचा स्वागत सोहळा उत्साहात संपन्न.
पन्हाळा : प्रसाद जाधव /एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
येथील संजीवन शिक्षण समूहाच्या छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेमधील इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेतलेल्या नवागतांचा स्वागत सोहळा विविध सांस्कृतिक उपक्रमांनी अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.
गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून झालेल्या या सोहळ्याचा आरंभ संजीवन शिक्षण समूहाचे सह-सचिव एन. आर.भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या शिल्पा पाटील-सांगावकर, प्रा.एस.आर जमादार, आर. पी. निपाणकर आणि सांस्कृतिक विभागप्रमुख संदीप सरदेसाई यांच्याहस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने झाला. नंतर मान्यवरांचे स्वागत तसेच सर्व प्राध्यापक आणि अन्य कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविकात प्राचार्या शिल्पा पाटील यांनी गुरुकुल संस्कृतीचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना मोबाईलच्या मोहजाळापासून दूर राहून आत्मभानाने जगण्याचा मोलाचा सल्ला दिला.
त्यानंतर अकरावी आणि बारावी मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एन. आर. भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाचे, विविध कलांचे आणि समयसूचकतेचे कौतुक केले तसेच जीवनातील गुरूंचे महत्त्व विशद केले.
सोहळ्यात प्रा. एस. आर. जमादार आणि मंगेश पैंजणे यांनी गीत गायन केले, तर शार्दूल राऊत आणि पार्थ माने यांनी पियानो व पखवाजवर सुमधुर वादन सादर केले. प्रा. विजय वायकोळ यांच्या सहकार्याने घेण्यात आलेले मनोरंजक खेळ व फिशपोंड्सने कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या नृत्याविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सोहळ्याच्या शेवटी दिल्लीतील सोनम वांगचुक यांचे उपोषण व विद्यार्थी आंदोलनावर आधारित जंतर-मंतर क्रांती निरंतर या प्रभावी नृत्य-नाट्याने उपस्थितांना अंतर्मुख केले.
संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन डॉ. पी. आर. भोसले आणि कार्यकारी संचालक सौरभ भोसले यांच्या सदिच्छा लाभलेल्या या सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी यांनी केले, छायाचित्रण नितीन गावडे यांनी तर नृत्यदिग्दर्शन विशाल पाटील यांनी सांभाळले. आभार प्रदर्शन संदीप सरदेसाई यांनी केले. .




