जपानमध्ये घडला मोठा चमत्कार ! तब्बल १ लाख वृद्धांनी पार केली शंभरी पण सरकारचं टेन्शन का वाढलं ?


आंतरराष्ट्रीय : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
जपानमध्ये घडला मोठा चमत्कार ! तब्बल १ लाख वृद्धांनी पार केली शंभरी पण सरकारचं टेन्शन का वाढलं ?
टोकियो : वृत्तसंस्था
जपानमध्ये दीर्घायुष्याचा नवा ऐतिहासिक टप्पा गाठला गेला असून देशात १०० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांची संख्या पहिल्यांदाच एक लाखाच्या पुढे गेली आहे. जपानच्या आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशातील शतकवीरांची एकूण संख्या आता तब्बल १ लाख ७ हजार ६७७ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, शंभरी ओलांडलेल्या या ज्येष्ठ नागरिकांमध्ये महिलांचे प्रमाण तब्बल ८७.६ टक्के म्हणजेच जवळपास ८८ टक्के इतके प्रचंड आहे.

जपानमध्ये दरवर्षी सप्टेंबर महिन्यात साजरा केल्या जाणाऱ्या पारंपारिक ‘ज्येष्ठ नागरिक सन्मान दिना’च्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. देशात सलग ५६ व्या वर्षी शतकवीरांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. १ सप्टेंबर रोजी स्थानिक रहिवासी नोंदवहीनुसार गोळा केलेल्या माहितीनुसार, गेल्या एका वर्षात १०० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांमध्ये ७ हजार ९१४ ने वाढ झाली आहे. सध्याच्या १ लाख ७ हजार ६७७ शतकवीरांमध्ये तब्बल ९४ हजार २९८ महिला असून, पुरुषांची संख्या १३ हजार ३७९ आहे. चालू आर्थिक वर्षात आणखी सुमारे ५४ हजार नागरिक वयाची शंभरी पूर्ण करणार असल्याचा अंदाजही मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, क्योटो येथील रहिवासी असलेल्या ११४ वर्षीय फूयो किशिमोतो या सध्या जपानमधील सर्वांत वयोवृद्ध नागरिक आणि सर्वांत वयस्कर महिला आहेत. त्यांचा जन्म २० डिसेंबर १९११ रोजी झाला होता. दुसरीकडे, कुमामोतो येथील ११२ वर्षीय हिकारू कातो हे देशातील सर्वांत वयस्कर पुरुष ठरले असून त्यांचा जन्म २ मे १९१४ रोजी झाला होता. सध्याच्या आकडेवारीनुसार जपानमध्ये दर एक लाख लोकसंख्येमागे सरासरी ८७.५१ नागरिक हे १०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. प्रांतांचा विचार करता, शिमाने प्रांतात हे प्रमाण सर्वाधिक असून तिथे दर एक लाख लोकांमागे सुमारे १८६ शतकवीर आहेत.
जपान सरकारने जेव्हा १९६३ मध्ये पहिल्यांदा अशा शतायुषी नागरिकांची अधिकृत मोजणी सुरू केली होती, तेव्हा संपूर्ण देशात १०० वर्षे पूर्ण केलेले केवळ १५३ नागरिक होते. त्यानंतर देशाच्या वैद्यकीय आणि सामाजिक विकासाबरोबर हा आकडा वेगाने वाढत गेला. १९८१ मध्ये ही संख्या एक हजारावर पोहोचली, तर १९९८ मध्ये तिने दहा हजारांचा टप्पा ओलांडला. २०१२ मध्ये जपानमधील शतकवीरांची संख्या ५० हजारांवर गेली होती, तर आता अवघ्या चौदा वर्षांत ही संख्या दुपटीने वाढून थेट एक लाखाच्या पुढे गेली आहे. जागतिक बँकेच्या नोंदीनुसार, मोनॅकोनंतर जपान हा जगातील सर्वाधिक सरासरी वय असलेला देश मानला जातो. येथे महिलांचे सरासरी आयुर्मान सुमारे ८७.३३ वर्षे, तर पुरुषांचे सुमारे ८१.३५ वर्षे इतके आहे.
प्रगत वैद्यकीय सुविधा, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा विस्तार, नियमित शारीरिक हालचाली आणि मासे, भाज्या व सोयाबीनवर आधारित पारंपारिक संतुलित आहार यामुळे जपानी नागरिक दीर्घायुषी ठरत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, नागरिकांचे वाढते आयुर्मान हे जपानच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि प्रशासनासाठी एक गंभीर चिंतेचा विषय बनले आहे.
एका बाजूला वृद्धांची संख्या सातत्याने वाढत असताना, दुसऱ्या बाजूला देशातील जन्मदर ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. परिणामी काम करणाऱ्या तरुणांची संख्या झपाट्याने घटत असून, ज्येष्ठांच्या निवृत्तिवेतन, वैद्यकीय उपचार आणि सामाजिक सुरक्षेवरील खर्चाचा प्रचंड ताण जपानच्या तिजोरीवर पडत आहे. हा वाढता भार कसा पेलवायचा, असा मोठा प्रश्न आता जपान सरकारपुढे उभा ठाकला आहे.




